Women Safety Report: शहरी भागातील 40 टक्के महिला असुरक्षित; दिल्ली, कोलकाता, रांची सारख्या शहरांमध्ये जास्त धोका
Women Safety Report: भारतामध्ये महिलांच्या सुरक्षिततेबाबत अनेकदा वादविवाद होतात, पण आता ‘राष्ट्रीय वार्षिक अहवाल आणि महिला सुरक्षेवरील निर्देशांक-नारी 2025’ या ताज्या अहवालाने धक्कादायक वस्तुस्थिती समोर आणली आहे. अहवालानुसार, शहरी भागात राहणाऱ्या 40 टक्के महिला स्वतःला सुरक्षित समजत नाहीत. हा सर्वेक्षण अहवाल 31 शहरांमधील 12770 महिलांच्या अनुभवांवर आधारित आहे. 2024 मध्ये 7 टक्के महिलांना छेडछाडीसारख्या घटनांना सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे, 18 ते 24 वयोगटातील तरुणींना सर्वाधिक धोका असल्याचं या अहवातून स्पष्ट झालं आहे.
नोंदीपेक्षा 100 पट जास्त प्रकरणे
हा आकडा एनसीआरबी (नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो) 2022 मध्ये नोंदवलेल्या प्रकरणांपेक्षा 100 पट जास्त आहे. यावरून मोठ्या प्रमाणात छेडछाडीची प्रकरणे अजूनही नोंदवली जात नाहीत, हे स्पष्ट होते. महिलांनी सांगितले की त्यांना अनेकदा टक लावून पाहणे, अश्लील टिप्पण्या करणे, गर्दीत स्पर्श करणे यासारख्या घटनांना सामोरे जावे लागले. या घटनांसाठी महिलांनी अपुरे रस्त्यावरील दिवे, कमकुवत पायाभूत सुविधा, आणि असुरक्षित सार्वजनिक वाहतूक जबाबदार ठरवले.
सर्वात असुरक्षित शहरे -
अहवालानुसार खालील शहरे महिलांसाठी सर्वात असुरक्षित ठरली आहेत:
दिल्ली कोलकाता रांची श्रीनगर फरिदाबाद
तुलनेने सुरक्षित शहरे
मुंबई कोहिमा विशाखापट्टणम भुवनेश्वर ऐझवाल गंगटोक इटानगर
हेही वाचा - Arun Gawli : शिवसेना नगरसेवक हत्येप्रकरणी अरुण गवळीला दिलासा; तब्बल 18 वर्षांनंतर जामीन मंजूर
महिलांनी तक्रार का नोंदवली नाही?
अहवालानुसार, फक्त 22 टक्के महिला छळाविषयी अधिकाऱ्यांना सांगतात. उर्वरित महिला पुढील त्रासाची भीती, समाजातील बदनामी किंवा टोमण्यांमुळे तक्रार दाखल करत नाहीत. याशिवाय, 53 टक्के महिलांना हे माहीतही नव्हते की त्यांच्या कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक धोरण आहे की नाही, जे कायद्याने अनिवार्य आहे.
दरम्यान, दिल्लीमध्ये अहवाल प्रसिद्ध करताना राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले की, हा अहवाल महिलांच्या खऱ्या सुरक्षिततेच्या चिंता समजून घेण्यास मदत करेल. आमचे उद्दिष्ट प्रत्येक महिलेला सर्वत्र सुरक्षित वाटावे, मग ते घर असो, कामाचे ठिकाण असो किंवा सार्वजनिक जागा.