J&K Cloud Burst Update: जम्मू-काश्मीरमधील रियासीमध्ये भूस्खलनात कुटुंबातील 7 जणांचा तर रामबनमध्ये 4 जणांचा मृत्यू
J&K Cloud Burst Update: जम्मू आणि काश्मीरमध्ये शनिवारी ढगफुटी व भूस्खलनाच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये किमान 11 जणांचा मृत्यू झाला आहे. रामबन जिल्ह्यातील राजगड या पर्वतीय भागात ढगफुटीमुळे अचानक पूर आल्याने तीन जणांचा मृत्यू झाला असून, अनेक घरे कोसळून मोठे नुकसान झाले. अचानक आलेल्या पुरात दोन जण बेपत्ता असून, त्यांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने बचावकार्य सुरू केले आहे.
रियासी जिल्ह्यात भूस्खलनात 7 जणांचा मृत्यू
शनिवारी सकाळी रियासी जिल्ह्यातील माहोर तालुक्यातील बदर गावात मोठे भूस्खलन झाले. यात एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुसळधार पावसाने कहर
गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे नद्या-नाले तुडुंब भरले असून, अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जम्मूमध्ये पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये आतापर्यंत 45 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
पूरग्रस्त भागात मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी उधमपूर जिल्ह्यातील बाधित भागांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तर उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी जम्मूतील पूरग्रस्तांशी भेट घेऊन प्रशासनाकडून सुरू असलेल्या मदतकार्याची पाहणी केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत 12 हजार हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. प्रशासन, एनडीआरएफ आणि स्थानिक बचाव पथके मिळून आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचे प्रयत्न करत आहेत.