अहमदाबादमध्ये शेअर बाजार संचालकाच्या बंद फ्लॅटमध्ये सापडलं 90 किलो सोनं! रोख रक्कम पाहून थक्क झाले ATS अधिकारी
90 kg Gold Found in Closed Flat: गुजरातमधील अहमदाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुजरात एटीएस आणि महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) संयुक्त कारवाईत शहरातील पालदी परिसरातील एका शेअर बाजार संचालकाच्या रिकाम्या फ्लॅटवर छापा टाकला. यावेळी जे काही सापडले ते पाहून अधिकारी थक्क झाले. डीआरआय आणि एटीएसचे अधिकारी सोन्याचे खरे वजन आणि किंमत तपासत असताना, सध्याच्या बाजारभावानुसार त्याची किंमत 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते, असं सांगण्यात येत आहे. एटीएस अधिकाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली होती की, गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात सोने तस्करी करून पालडी येथील अविष्कार अपार्टमेंटमधील एका बंद फ्लॅटमध्ये लपवले जात आहे.
25 अधिकाऱ्यांनी टाकला छापा -
यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर तपास यंत्रणा आणि पोलिसांनी एका बंद फ्लॅटमध्ये हा छापा टाकला. आज दुपारी सुमारे 25 अधिकाऱ्यांनी पालदी येथील शेअर बाजार संचालकाच्या अविष्कार अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक 104 वर छापा टाकला. या फ्लॅटचे मालक महेंद्र शाह आणि मेघ शाह नावाच्या व्यक्ती असल्याचे उघड झाले. दोघेही शेअर बाजार संचालक आहेत.
दरम्यान, पथकाला फ्लॅटमध्ये एक बंद बॉक्स सापडला. जेव्हा हा बॉक्स उघडण्यात आला, तेव्हा त्यात मोठ्या प्रमाणात सोने सापडले आणि ते कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली सील करण्यात आले. सध्या शेअर बाजारातील दलालाची चौकशी केली जात असून एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने कुठून आले याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हेही वाचा - Asia Longest Hyperloop Tube: IIT च्या विद्यार्थ्यांनी बनवली आशियातील सर्वात लांब हायपरलूप ट्यूब; पहा व्हिडिओ
60 ते 70 लाख रुपये रोख रक्कम जप्त -
अधिकाऱ्यांनी नोटा मोजण्यासाठी दोन मशीन आणि सोने वजन करण्यासाठी इलेक्ट्रिक तराजू मागवले. तपासात सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आल्याचे समोर आले असून याची एकूण वजन 90-100 किलो असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय काही दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. एकूणच, बाजारात त्याची किंमत 100 कोटी रुपयांपर्यंत असण्याचा अंदाज आहे. याशिवाय, छाप्यात सुमारे 60 ते 70 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले.