राज्यसभा निवडणुकीसाठी अभिनेता कमल हासन यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Rajya Sabha Election 2025: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम (एमएनएम) प्रमुख कमल हासन यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एमएनएमने द्रमुकच्या नेतृत्वाखालील इंडिया ब्लॉकला पाठिंबा दिला होता. त्यानंतर द्रमुकने एमएनएमला राज्यसभेची जागा दिली होती, ज्यानंतर हसन यांनी नामांकन दाखल केले आहे.
दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुक अध्यक्ष एमके स्टॅलिन यांनी सांगितले की, कमल हासन यांच्या पक्ष एमएनएमला एक जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांमध्ये एक करार झाला होता. द्रमुकने राज्यसभेसाठी उर्वरित तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये पक्षाने पी विल्सन, सलमा आणि एसआर शिवलिंगम यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतील सहा सदस्य, अंबुमणी रामदास (पट्टाली मक्कल कच्ची), एन चंद्रशेखरन (ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कझगम), एम षण्मुगम (द्रविड मुन्नेत्र कझगम), पी विल्सन (द्रमुक) आणि वैको (मारुमलारची द्रविड मुन्नेत्र कझगम) यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे.
हेही वाचा - वक्फ संदर्भातील UMEED पोर्टल लाँच! कशी केली जाईल मालमत्तेची पडताळणी? जाणून घ्या
राज्यसभेच्या 8 जागांसाठी निवडणुका जाहीर -
निवडणूक आयोगाने अलीकडेच राज्यसभेच्या 8 जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या आहेत. या निवडणुका 19 जून रोजी होणार आहेत. यामध्ये आसाम आणि तामिळनाडू या दोन राज्यांच्या आठ जागांवर द्वैवार्षिक निवडणुका होणार आहेत. आठ सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे.