Airtel Down: एअरटेलची सेवा पुन्हा ठप्प! 'या' शहरातील वापरकर्त्यांना करावा लागतोय समस्यांचा सामना
Airtel Outage: भारतातील अग्रगण्य टेलिकॉम कंपनी एअरटेल पुन्हा एकदा सेवा समस्येमुळे चर्चेत आली आहे. कोट्यवधी वापरकर्त्यांना कॉल, एसएमएस आणि डेटा सेवांचा वापर करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठवड्यातच दिल्ली-एनसीआरसह अनेक शहरांमध्ये एअरटेलची सेवा दीड तास विस्कळीत झाली होती. त्यानंतर आता पुन्हा समस्या उद्भवल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. बेंगळुरू, हैदराबाद, कोलकाता आणि चेन्नई या प्रमुख शहरांमध्ये सेवा ठप्प झाल्याच्या तक्रारी सर्वाधिक नोंदवल्या गेल्या आहेत. डाउनडिटेक्टरनुसार, दुपारी 12:11 वाजता एअरटेलची सेवा खंडित झाली. सेवा खंडित झाल्याने सुमारे 6815 हून अधिक वापरकर्त्यांनी तक्रार नोंदवली. अनेकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरही या समस्येबाबत पोस्ट केली आहे.
हेही वाचा - Anil Ambani: एसबीआयच्या फसवणुकीच्या प्रकरणात अनिल अंबानीवर CBI कारवाई, महत्वाचे दस्तऐवज जप्त
दरम्यान, एअरटेल केअर्सने या समस्येची दखल घेतली असून तांत्रिक बिघाडामुळे वापरकर्त्यांना कनेक्टिव्हिटी अडचणी आल्याची पुष्टी केली आहे. कंपनीने सांगितले की तांत्रिक टीम दुरुस्तीसाठी कार्यरत असून समस्या एका तासात सोडवली जाईल. तसेच, वापरकर्त्यांची झालेली गैरसोय लक्षात घेऊन कंपनीने माफीही मागितली आहे.
गेल्या आठवड्यातील सेवा ठप्प होण्याच्या घटनेतही वापरकर्त्यांना कॉल आणि एसएमएस करण्यास किंवा स्वीकारण्यास अडचणी येत होत्या. त्याचप्रमाणे इंटरनेट सेवा देखील विस्कळीत झाली होती. सलग दोन आठवड्यांत एअरटेलला या समस्या भेडसावल्याने ग्राहकांमध्ये सेवेच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
तज्ज्ञांचे मत आहे की तांत्रिक अडचणीमुळे टेलिकॉम सेवा विस्कळीत होणे ही सामान्य बाब असली तरी वारंवार घडणाऱ्या घटना वापरकर्त्यांच्या अनुभवावर थेट परिणाम करतात. जर तुम्हाला तुमच्या एअरटेल नंबरवरून कॉल करण्यात किंवा एसएमएस पाठवण्यात समस्या येत असतील, तर तुमच्या फोनचा एअरप्लेन मोड चालू करा आणि नंतर तो पुन्हा बंद करा. असे केल्याने नेटवर्क रिफ्रेश होईल आणि कॉलिंग किंवा एसएमएसची समस्या दूर होईल. याशिवाय, वापरकर्ते त्यांचा फोन बंद आणि नंतर चालू देखील करू शकतात.