मायावतींनी पुन्हा व्यक्त केला पुतण्या आकाश आनंदवर विश्वास; बसपामध्ये दिली 'ही' महत्त्वाची जबाबदारी
Chief National Coordinator of BSP: मायावतींचे पुतणे आकाश आनंद यांनी बहुजन समाज पक्षात शानदार पुनरागमन केले आहेत. आकाश आनंद यांनी पक्षात त्यांचे स्थान आणि प्रतिष्ठा परत मिळवली आहे. बसपा सुप्रीमो आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी आकाश आनंद यांची पक्षाच्या मुख्य राष्ट्रीय समन्वयकपदी नियुक्ती केली. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत मायावती यांनी आकाश आनंद यांच्या नवीन नियुक्तीची घोषणा केली.
हेही वाचा - Boycott Turkey: IIT बॉम्बेचा तुर्कीवर बहिष्कार! विद्यापीठांसोबतचा सामंजस्य करार केला रद्द
आकाश आनंद यांची राष्ट्रीय समन्वयकपदी नियुक्ती -
बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी देशभरातील पक्षाच्या लोकांच्या संमतीने आकाश आनंद यांची बसपाच्या मुख्य राष्ट्रीय समन्वयकपदी नियुक्ती केली. याशिवाय, आकाश यांना पक्षाच्या भविष्यातील इतर कार्यक्रमांची जबाबदारीही देण्यात आली आहे. तथापि, मायावती यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे की, 'आशा आहे की यावेळी पक्ष आणि चळवळीच्या हितासाठी आकाश सर्व प्रकारची खबरदारी घेईल आणि पक्ष मजबूत करण्यास मदत करेल.'
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश आनंद येत्या निवडणुकीत बसपाच्या प्रचाराची जबाबदारी घेऊ शकतात. याआधी मायावती यांनी आकाश आनंद आणि त्यांचे सासरे अशोक सिद्धार्थ यांना पक्षातून काढून टाकले होते. यानंतर आकाश आनंद यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत आपली चूक मान्य करत माफी मागितली. त्यांनी मायावतींच्या नेतृत्वाखाली स्वतःला जोडण्याचे वचन दिले आणि कोणत्याही नातेवाईकाकडून राजकीय सल्ला घेणार नसल्याचे सांगितले.