पीएम इंटर्नशिपसाठी पुन्हा अर्ज सुरू! दरमहा मिळणार 5 हजार रुपये
Application For PM Internship Scheme: पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचा (PMIS) लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. या योजनेच्या दुसऱ्या राऊंडसाठी पुन्हा एकदा अर्ज सुरू झाले आहेत. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने एक प्रेस रिलीज जारी करून ही माहिती दिली आहे. मंत्रालयाकडून प्रसिद्ध झालेल्या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की, पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या पहिल्या टप्प्यातील दुसऱ्या फेरीसाठी अर्ज सुरू झाले आहेत. या योजनेअंतर्गत, देशातील 730 जिल्ह्यांमधील 1 लाखाहून अधिक तरुणांना आघाडीच्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप दिली जाईल.
'या' वयातील तरुणांना मिळेल संधी -
पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत, 21 ते 24 वर्षे वयोगटातील, जे कोणत्याही पूर्णवेळ शैक्षणिक कार्यक्रमात किंवा नोकरीत नाहीत, त्यांना इंटर्नशिप दिली जाईल. जुलै 2024 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या योजनेची घोषणा केली होती. ही योजना सुरू करण्यामागील उद्देश बेरोजगार तरुणांना योग्य संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
उमेदवार 'या' तारखेपर्यंत करू शकतात अर्ज -
या योजनेच्या दुसऱ्या फेरीत अर्ज करण्यासाठी, इच्छुक उमेदवारांनी वेबसाइटवर प्रोफाइल तयार करावे आणि विविध क्षेत्रातील इंटर्नशिपसाठी अर्ज करावा. अर्जाच्या दुसऱ्या फेरीत, उमेदवार अर्जाच्या शेवटच्या तारखेपर्यंत 3 इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2025 आहे.
दरमहा मिळतील 5 हजार रुपये -
या योजनेअंतर्गत, उमेदवाराला 12 महिन्यांसाठी इंटर्नशिप मिळेल आणि दरमहा 5 हजार रुपये मिळतील. याशिवाय, इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर 6 हजार रुपयांचे एक-वेळ अनुदान दिले जाईल. या योजनेच्या पायलट प्रोजेक्टचा अंदाजे खर्च सुमारे 800 कोटी रुपये आहे.
पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचा पहिला टप्पा -
दरम्यान, प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या पहिला टप्पा 3 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू करण्यात आला होता. कंपन्या pminternship.mca.gov.in या पोर्टलवर इंटर्नशिपच्या संधींची नोंदणी करत होत्या. या कालावधीत, देशातील 6 लाखांहून अधिक तरुणांनी अर्ज केले होते, ज्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2024 होती.