बँक कर्मचाऱ्यांच्या एका संघटनेनेही या संपात सहभागी

9 जुलै रोजी बँकिंग आणि विमा सेवा बंद राहणार? देशभरातील 25 कोटी कर्मचारी संपावर जाणार

Nationwide Strike

Nationwide Strike: कामगारांच्या हक्कांबद्दल आणि केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांबद्दल देशात असंतोष वाढत आहे. याच्या निषेधार्थ केंद्रीय कामगार संघटनांनी 9 जुलै रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. या संपाला आता कामगार संघटना तसेच शेतकरी संघटना आणि महाआघाडीतील अनेक पक्षांचा पाठिंबा मिळत आहे. ताज्या माहितीनुसार, बँक कर्मचाऱ्यांच्या एका संघटनेनेही या संपात सहभागी होणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता बुधवारी, 9 जुलै रोजी बँकिंग सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. विमा क्षेत्रातील कर्मचारीही या संपात सहभागी होणार आहेत.

बँक संघटनाही देशव्यापी संपात सहभागी होणार -

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) शी संलग्न असलेल्या बंगाल प्रांतीय बँक कर्मचारी संघटनेने (BPBEA) पुष्टी केली आहे की AIBEA, AIBOA आणि BEFI सारख्या बँकिंग क्षेत्रातील अनेक प्रमुख संघटना या संपात सहभागी होतील. या मोठ्या देशव्यापी संपाचा परिणाम अत्यावश्यक सेवांवर होणार हे निश्चित आहे. 10 केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांच्या संलग्न युनिट्सच्या गटाने 'सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि देशविरोधी कॉर्पोरेट-केंद्रित धोरणांचा निषेध करण्यासाठी या सर्वसाधारण संपाचे किंवा 'भारत बंद'चे आवाहन केले आहे.

हेही वाचा - अहमदाबाद अपघातासंदर्भात संसदीय समिती नागरी विमान वाहतूक अधिकाऱ्यांशी करणार चर्चा

विमा क्षेत्राचा संपाला पाठींबा - 

असोसिएशनच्या मते, विमा क्षेत्रातील कर्मचारीही या संपात सहभागी होतील. बँकिंग आणि विमा क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांनी असा दावा केला आहे की हा संप व्यापक असेल आणि त्याचा परिणाम देशभर दिसून येईल. बँक संघटनांनी दावा केला आहे की या सर्वसाधारण संपात 15 कोटींहून अधिक कर्मचारी सहभागी होऊ शकतात. 

हेही वाचा - ग्रीसच्या राजदूतांनी केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील शब्दांचं कौतुक

ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या अमरजीत कौर यांनी सांगितलं की, या संपात 25 कोटींहून अधिक कामगार सहभागी होण्याची अपेक्षा आहे. शेतकरी आणि ग्रामीण कामगार देखील या देशव्यापी संपाचा भाग असतील. तथापी, हिंद मजदूर सभेचे हरभजन सिंग सिद्धू यांनी सांगितले की, संपामुळे बँकिंग, टपाल, कोळसा खाणकाम, कारखाने, राज्य वाहतूक सेवा प्रभावित होतील.