चीनचा नवा कुरापतखोर डाव; अरुणाचल प्रदेशातील नावं बदलण्याच्या प्रयत्नांना भारताचं सडेतोड प्रत्युत्तर
नवी दिल्ली: भारताच्या ईशान्येकडील राज्य अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बदलण्याचा चीनकडून पुन्हा एकदा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र भारताने या खोडसाळ वागणुकीचा तीव्र निषेध करत स्पष्टपणे सांगितले की, नावं बदलली तरी वास्तव बदलणार नाही. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि कायम राहील.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनच्या या एकतर्फी कृतीवर कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले, चीनकडून अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नावे बदलण्याचा निरर्थक, हास्यास्पद आणि प्रक्षोभक प्रयत्न केला जात आहे. भारत याला कधीही मान्यता देणार नाही. आम्ही आमच्या सैद्धांतिक भूमिकेशी पूर्णपणे एकनिष्ठ आहोत.
चीनने यापूर्वीही 2024 मध्ये अरुणाचलमधील 30 ठिकाणांची नावे बदलून नवीन यादी प्रसिद्ध केली होती, ज्यावर भारताने तीव्र नाराजी व्यक्त करत ती यादी फेटाळून लावली होती. चीन अरुणाचल प्रदेशवर आपला दावा सांगत अनेक वेळा भारतीय नेत्यांच्या दौऱ्यावरही आक्षेप घेत असतो. मात्र भारताने नेहमीच ठामपणे सांगितले आहे की अरुणाचल प्रदेश हा भारताचा भाग आहे आणि त्यावर कोणताही वादच नाही.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी यापूर्वी स्पष्टपणे सांगितले होते की, 'जर मी तुमच्या घराचे नाव बदलले, तर ते माझे होईल का?' हे वक्तव्य चीनच्या भूमिकेवर अचूक प्रत्युत्तर होते. त्यांनी हा मुद्दा उचलून धरताना म्हटले होते की, 'चीनच्या नकाशात नावं बदलून काहीही साध्य होणार नाही. वास्तव बदलत नाही.'
भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनच्या अशा कुरापतींवर लक्ष वेधले असून जागतिक समुदायालाही सूचित केले आहे की चीन सातत्याने सीमावाद उकरून काढून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे.
चीनची ही राजकीय खेळी फक्त मानसिक युद्धाचे एक साधन आहे, ज्याद्वारे ते आंतरराष्ट्रीय लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र भारत यापुढेही ठामपणे आणि शांततेच्या मार्गाने आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करत राहणार आहे.