Dehradun Cloudburst: देहरादूनमध्ये ढगफुटी; तपकेश्वर महादेव मंदिर पाण्याखाली, बचावकार्य सुरू
Dehradun Cloudburst: उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये सोमवारी रात्री उशिरा ढगफुटीची घटना घडली. प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या सहस्त्रधारा परिसरातील कार्लीगड येथे झालेल्या या आपत्तीत जोरदार प्रवाहामुळे अनेक दुकाने वाहून गेली असून दोन जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे अद्यापपर्यंत मोठी जीवितहानी झालेली नाही. मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी ट्विट करून सांगितले की, मुसळधार पावसामुळे काही दुकानांचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासन, एसडीआरएफ आणि पोलिस यंत्रणा पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी कार्यरत आहेत.
बचावकार्य सुरू
ढगफुटीच्या घटनेनंतर एसडीआरएफ आणि एनडीआरएफची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून जड यंत्रसामग्रीसह मदत आणि बचावकार्य अजूनही सुरू आहे. बेपत्ता दोघांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. प्रवाहाचा जोर इतका होता की नदीकाठावरील अनेक दुकाने पूर्णपणे वाहून गेली असून लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तथापि प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
हेही वाचा - Adv. Siddharth Shinde : सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
तपकेश्वर महादेव मंदिर पाण्याखाली
मुसळधार पावसामुळे तामसा नदीला पूर आला असून प्रसिद्ध तपकेश्वर महादेव मंदिर परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. मंदिराचे पुजारी आचार्य बिपिन जोशी यांनी सांगितले की, पहाटे 5 वाजल्यापासून पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आणि संपूर्ण मंदिर परिसर बुडाला. मात्र गर्भगृह सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
हवामान खात्याचा इशारा
उत्तराखंडच्या अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे. हवामान खात्याने आज पिवळा इशारा जारी केला आहे. देहरादून, बागेश्वर, पिथोरागड, चंपावत, नैनिताल या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. चमोली, उधमसिंह नगर, पिथोरागड यांसह काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देहरादूनमध्ये आज कमाल तापमान 32°C आणि किमान तापमान 24°C असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.