काँग्रेसची देशव्यापी मोहिम! मतदार चोरी प्रकरणी राहुल गांधींनी लाँच केले खास पोर्टल
नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर फसवणुकीचा गंभीर आरोप करत लोकशाहीच्या रक्षणासाठी देशव्यापी मोहिमेची घोषणा केली आहे. राहुल गांधींनी स्पष्ट केले की, हा मुद्दा ते देशाच्या कानाकोपऱ्यात नेणार आहेत. 11 ऑगस्ट रोजी दुपारी 4:30 वाजता 24, अकबर रोड येथे पक्षाच्या सरचिटणीस, प्रभारी आणि संघटना प्रमुखांची महत्त्वाची बैठक होणार असून यात मतदार यादीतील फेरफार आणि निवडणूक घोटाळ्यांविरुद्ध मोठ्या मोहिमेची आखणी करण्यात येणार आहे. या मोहिमेचे नेतृत्व काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे करणार आहेत.
काँग्रेसने 'मत चोरी' या संदर्भात एक 'वेब पेज' सुरू केले आहे. या वेबसाइटवर, लोक कथित 'मत चोरी' विरोधात निवडणूक आयोगाकडून जबाबदारीची मागणी करण्यासाठी आणि डिजिटल मतदार यादीच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी स्वतःची नोंदणी करू शकतात. राहुल गांधी यांनी त्यांच्या एक्स हँडलवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, मतांची चोरी हा 'एक व्यक्ती, एक मत' या मूलभूत लोकशाही तत्त्वावर हल्ला आहे. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी स्वच्छ मतदार यादी आवश्यक आहे. निवडणूक आयोगाकडे आमची मागणी स्पष्ट आहे की, पारदर्शकता दाखवा आणि डिजिटल मतदार यादी सार्वजनिक करा, जेणेकरून जनता आणि राजकीय पक्ष स्वतः त्याचे ऑडिट करू शकतील. लोकशाहीच्या या लढ्यात सहभागी होण्यासाठी http://votechori.in/ecdemand या वेबसाइटला भेट देण्याचे किंवा 9650003420 वर मिस्ड कॉल देण्याचे आवाहनही राहुल गांधी यांनी केलं आहे.
राहुल गांधी यांची एक्स पोस्ट -
हेही वाचा - ‘मत चोरी हा संविधानाचा विश्वासघात आहे; राहुल गांधींचा निवडणूक आयोग आणि भाजपवर हल्लाबोल
काँग्रेस, इंडिया ब्लॉकच्या मित्रपक्षांसह, बिहारमधील मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावृत्तीला विरोध दर्शवत आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी महात्मा गांधी यांनी दिलेल्या करा किंवा मरा घोषणेचा संदर्भ देत सांगितले की, आज लोकशाही वाचवण्यासाठी अशाच प्रकारची लढाई उभारणे गरजेचे आहे.
हेही वाचा - ''राहुल गांधींच्या मेंदूची चिप चोरी झालीय''; देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींवर निशाणा
दरम्यान, राहुल गांधींनी 7 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत सांगितले की कर्नाटकात काँग्रेसला 16 लोकसभा जागा जिंकण्याची अपेक्षा होती, पण फक्त नऊ जागा मिळाल्या. महादेवपुरा जागेवर संशोधनात 1,00,250 मतांची चोरी झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना इशारा दिला की अशा गैरव्यवहारात सहभागी असलेल्या लोकांना शोधून कारवाई केली जाईल.