दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. या

Delhi Election Results 2025: दिल्लीत भाजप आघाडीवर, मुख्यमंत्रीपदासाठी ‘या’ नावांची चर्चा

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. यात सुरूवातीच्या कलांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे चित्र आहे. सकाळी साडे नऊ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, भाजपला दिल्लीमध्ये स्पष्ट बहुमत मिळत आहे. साडेनऊच्या आकडेवारीनुसार, भाजप ५० जागांवर आघाडीवर आहे. तर आपचे उमेदवार १९ आणि काँग्रेस फक्त एका जागेवर आघाडीवर आहे.    

हाच ट्रेंड शेवटपर्यंत कायम राहिल्यास, दिल्लीचा ‘गड’ भाजप काबीज करेल. यादरम्यान, भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारांबाबत आत्तापासूनच विविध नावांची चर्चा सुरू आहे. ते चेहरे कोण आहेत. हे पाहुयात...

विरेंद्र सचदेवा – मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर सचदेवा यांचे नाव आहे. ते दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष असून त्यांची प्रतिमा ‘क्लिन’ आहे. यामुळे सचदेवा यांना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागू शकते.

मनोज तिवारी – दिल्ली मुख्यमंत्रीपदासाठी मनोज तिवारी यांचं नाव फेवरेट असल्याचे बोललं जात आहे. ते दिल्लीतील खासदार आहेत. तसेच ते भोजपुरी अभिनेते आहेत. तिवारी हे पूर्वांचलचे चर्चित चेहरा असल्याने, त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडू शकते.

विजेंद्र गुप्ता – विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता हे देखील डॉर्क हॉर्स ठरू शकतात. ते रोहिणी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांची लढत आपचे प्रदिप मित्तल यांच्याशी होत आहे. ऐनवेळी भाजपकडून गुप्ता यांचे नाव देखील मुख्यमंत्री पदासाठी फिक्स करण्यात येऊ शकते.   

प्रवेश वर्मा – हे देखील दिल्ली मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. ते माजी खासदार आहेत. त्यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.

बांसुरी स्वराज – याचे नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे. त्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या कन्या आणि नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत.