दिल्ली उच्च न्यायालयाकडून Amazon ला झटका! 323 कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे दिले आदेश
दिल्ली उच्च न्यायालयाने ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज अॅमेझॉन (Amazon) ला मोठा झटका दिला आहे. बेव्हरली हिल्स पोलो क्लब ट्रेडमार्कचे उल्लंघन केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने अॅमेझॉनच्या युनिटला 39 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 323 कोटी रुपये) नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण ?
न्यायाधीश प्रतिभा एम. सिंह यांच्या खंडपीठाला असे आढळून आले की, अमेझॉन त्यांच्या वेबसाइटवर बेव्हरली हिल्स पोलो क्लबचा घोडेस्वार लोगो वापरत आहे. हा लोगो 2007 पासून भारतात नोंदणीकृत आणि वापरात आहे.
हेही वाचा - Dark Web: डार्क वेबवर होते 'या' गोष्टींची खरेदी विक्री आणि तस्करी
अमेझॉनच्या 'सिम्बॉल' ब्रँड अंतर्गत विकले जाणारे कपडे 375 रुपयांपर्यंत कमी किमतीत विकले जात होते, तर पोलो ब्रँडचे कपडे 2,500 ते 4,500 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. मोठ्या सवलतींच्या या धोरणामुळे ब्रँडचे वेगळेपण कमी होत होते आणि ग्राहकांची दिशाभूल होत होती.
क्लाउडटेल लोगो न वापरण्याचे निर्देश -
दरम्यान, 12 ऑक्टोबर 2020 रोजी, Amazon आणि त्यांच्या माजी विक्रेता कंपनी क्लाउडटेलविरुद्ध एक अंतरिम आदेश जारी करण्यात आला, ज्यामध्ये त्यांना लोगो वापरण्यापासून रोखण्यात आले. तथापी, Amazon Technologies न्यायालयात हजर राहिले नाही, ज्यामुळे एकतर्फी निकाल लागला. क्लाउडटेलविरुद्धचा खटला मार्च 2023 मध्ये निश्चित करण्यात आला.
तथापी, 85 पानांच्या निकालात न्यायालयाने म्हटले आहे की, हे उल्लंघन गंभीर असून त्याचा परिणाम अगणित आहे. याशिवाय, दिल्ली न्यायालयाने असेही स्पष्ट केले की, उपलब्ध डेटाच्या अभावी, ट्रेडमार्क परवाना कराराच्या आधारे निर्णय देण्यात आला आहे.