Waqf Amendment Bill: संसदेत वक्फ विधेयकावर चर्चा सुरू; सभापतींनी विरोधकांना बोलण्यासाठी दिला 'इतका' वेळ
Waqf Amendment Bill: आज सभागृहात वक्फ विधेयकावर चर्चा होत आहे. सत्ताधारी पक्ष विधेयकाच्या बाजूने बोलत असून हे विधेयक मुस्लिमांच्या हिताचे असल्याचे म्हणत आहे. त्याच वेळी, विरोधी पक्ष हे विधेयक मुस्लिमांसाठी वादग्रस्त मानत आहेत. सभापतींनी सरकारला 4 तास 40 मिनिटे दिली आहेत, तर विरोधकांना बोलण्यासाठी 3 तास 20 मिनिटे दिली आहेत. संसदेत वक्फ विधेयकावरील चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि काँग्रेस नेते गौरव गोगोई यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. गौरव गोगोई आपला मुद्दा मांडत असताना, त्यांनी किरेन रिजिजू यांच्यावर सभागृहाची दिशाभूल करण्याचा आरोप केला. त्यानंतर मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, 'तुम्ही मी दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे, म्हणून कृपया मला सांगा की मी कोणता मुद्दा दिशाभूल केला आहे.'
सरकार संविधान कमकुवत करू इच्छिते - गौरव गोगोई
काँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले की, राम मंदिर मुद्द्यावर मी माझ्या पक्षाच्या वतीने बोललो हे माझे भाग्य आहे आणि आज मी वक्फ विधेयकावर पक्षाच्या वतीने माझे विचार मांडत आहे. सरकार संविधान कमकुवत करू इच्छित असून लोकांमध्ये फूट पाडू इच्छित आहे. भाजपने सांगावे की त्यांचे किती खासदार अल्पसंख्याक आहेत? असा सवालही यावेळी गौरव गोगोई यांनी उपस्थित केला आहे.
सरकार अल्पसंख्याकांना घाबरवत आहे -
गौरव गोगोई यांनी पुढे बोलताना म्हटलं आहे की, सरकार अल्पसंख्याकांना घाबरवत आहे. बोर्डात 2 पेक्षा जास्त महिला सदस्यांचा समावेश करण्याची तरतूद पूर्वीही होती. हे आधीच होते, पण ते आता आणत आहेत. त्यांना वक्फ बोर्ड कमकुवत करायचे आहे. म्हणून त्यांनी बोर्डाचे उत्पन्न 7 टक्क्यांवरून 5 टक्के केले.
हेही वाचा - प्रत्येक प्रकल्पाला विरोध झाला तर देश कसा प्रगती करेल? सर्वोच्च न्यायालयाने NGO ला फटकारले
सरकारची नजर एका विशिष्ट समुदायाच्या जमिनीवर -
दरम्यान, गौरव गोगोई यांनी पुढे म्हटलं की, आज सरकारची नजर एका विशिष्ट समुदायाच्या जमिनीवर आहे, उद्या सरकारची नजर दुसऱ्या समुदायाच्या जमिनीवर असेल. अशा अनेक जमिनी आहेत ज्यांच्याकडे कागदपत्रे नाहीत पण निर्णय बोर्डाच्या बाजूने आहे. मी अनेक जेपीसी पाहिल्या आहेत पण मी अशी जेपीसी पाहिली नाही. मला हे सांगताना खूप दुःख होत आहे की विरोधकांनी दिलेली एकही सूचना जेपीसीमध्ये समाविष्ट करण्यात आली नाही. जेपीसीमध्ये असे लोक होते ज्यांना वक्फबद्दल काहीच माहिती नव्हती.