हा सिग्नल मिळाल्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलने (ATC)

AI Express Flight Engine Fault: एअर इंडिया एक्सप्रेसच्या दिल्ली-इंदूर विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; पायलटने केला PAN-PAN कॉल

AI Express Flight Engine Fault: शुक्रवारी सकाळी दिल्लीहून इंदूरला येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या IX 1028 या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. विमानाच्या एका इंजिनमध्ये अचानक तांत्रिक अडचण निर्माण झाली. त्यावेळी विमानात एकूण 161 प्रवासी आणि कर्मचारी होते. पायलटने तात्काळ परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जीवघेणा नसलेला आपत्कालीन संदेश ‘पॅन-पॅन’ जारी केला.

हा सिग्नल मिळाल्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलने (ATC) मानक कार्यप्रणालीनुसार विमानतळावर तातडीने सुरक्षा यंत्रणा सक्रिय केली. अग्निशमन दल, वैद्यकीय पथके आणि इतर आपत्कालीन सेवा घटनास्थळी सज्ज ठेवण्यात आल्या. नियोजित वेळेनुसार हे विमान सकाळी 9.35 वाजता उतरायचे होते, मात्र खबरदारी म्हणून पायलटने 20 मिनिटे विलंब करत सकाळी 9.55 वाजता इंदूरच्या देवी अहिल्याबाई होळकर विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले.

विमान सुरक्षित उतरल्यावर सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप असल्याची माहिती विमानतळ संचालक विपिनकांत सेठ यांनी दिली. त्यांनी सांगितले की, इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळताच आम्ही विमानतळावर सर्व आपत्कालीन यंत्रणा तैनात केली. पायलटच्या तत्परतेमुळे कोणतीही दुर्घटना टळली आणि सर्व प्रवासी सुरक्षित राहिले.

हेही वाचा - Manipur News : NH-2 सुरू, SOO करारावरील चर्चेतून शांततेची आशा; पंतप्रधान मोदींच्या भेटीपूर्वी मोठे संकेत

‘पॅन-पॅन’ काय आहे? 

‘पॅन-पॅन’ हा एक आंतरराष्ट्रीय सिग्नल असून, तो हवाई तसेच सागरी वाहतुकीत आपत्कालीन प्रसंगी वापरला जातो. याचा अर्थ परिस्थिती गंभीर आहे, परंतु ती जीवघेणी नाही. अशा वेळी पायलटला त्वरित एटीसी किंवा ग्राउंड सर्व्हिसकडून मदतीची आवश्यकता असते. ‘मेडे’ या जीवघेण्या आपत्कालीन सिग्नलच्या आधीचा टप्पा म्हणून ‘पॅन-पॅन’ वापरला जातो.

हेही वाचा - Punjab Flood: पठाणकोटमध्ये डोंगर कोसळला! लुधियानामध्ये लष्कर तैनात; पूरात आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू

या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी विमान सुरक्षित उतरल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. विमान कंपनीने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून, तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.