धक्कादायक! केस प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर अभियंत्याचा मृत्यू; डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
कानपूर: केस प्रत्यारोपणानंतर एका अभियंताचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी 54 दिवसांनंतर आरोपी महिला डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एसीपी अभिषेक पांडे यांनी सांगितले की, ज्या व्यक्तीने अभियंत्याला डॉक्टरशी ओळख करून दिली त्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तथापि, ज्यांनी ही प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली होती, त्या कथित महिला डॉक्टर चौकशीसाठी आल्या नाहीत. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल.
काय आहे नेमकं प्रकरण?
मूळचे गोरखपूरचे रहिवासी असलेले 37 वर्षीय विनीत कुमार दुबे हे कानपूरमधील पंकी पॉवर प्लांटमध्ये सहाय्यक अभियंता होते. ते पत्नी जया आणि दोन मुलांसह पंकी येथील ऑफिसर्स कॉलनीत राहत होते. 11 मार्चनंतर पत्नी मुलांसह गोंडा येथील तिच्या पालकांच्या घरी गेली. विनीतने 13 मार्च रोजी केस प्रत्यारोपणासाठी वराही क्लिनिकच्या डॉ. अनुष्का तिवारीशी संपर्क साधला. यानंतर त्याने केस प्रत्यारोपण केले. पत्नी जया यांनी सांगितले की, 14 मार्च रोजी सकाळी त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून फोन आला. कॉल करणाऱ्याने सांगितले की विनीतचा चेहरा सुजला असून त्याला अनुराग रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर कॉल डिस्कनेक्ट झाला.
हेही वाचा - Fact Check: ताजमहालवरील पाकिस्तानच्या हल्ल्याचा बनावट व्हिडिओ व्हायरल; आग्रा पोलिसांनी सांगितले सत्य
उपचारादरम्यान मृत्यू -
जया यांनी सांगितले की, पुन्हा कॉल केला असता, मोबाईल फोन बंद लागला. रात्री 11 वाजताच्या सुमारास मी डॉ. अनुष्काच्या नंबरवर कॉल केला. पण त्यांचा फोनही बंद आढळला. यानंतर तिने कानपूरमध्ये राहणाऱ्या त्याच्या काकांना अनुराग रुग्णालयात पाठवले. विनीतची प्रकृती बिघडल्याने त्याच्या काकांनी त्याला रिजन्सी हॉस्पिटलमध्ये नेले. उपचारादरम्यान 15 मार्च रोजी त्यांचे निधन झाले.
हेही वाचा - Fact Check: भारतीय महिला पायलट शिवांगी सिंगला पकडल्याबद्दल बातम्या खोट्या; PIB कडून अफवांचे खंडण
दरम्यान, मृताच्या पत्नीचा आरोप आहे की, तिच्या पतीच्या मृत्यूनंतर जेव्हा तिने डॉ. अनुष्काशी चर्चा केली तेव्हा त्यांनी तिला कोणतीही तपासणी न करता केस प्रत्यारोपणात चूक झाल्याचं सांगितलं. प्रत्यारोपणानंतर काळजी घेण्यातही निष्काळजीपणा दिसून आला. वेदना झाल्यानंतर वेदना कमी करणारे इंजेक्शन देण्यात आले. तथापि, संबंधित अधिकाऱ्यांकडे दाद मागितल्यानंतर, आता डॉ. अनुष्काविरुद्ध रावतपूर पोलिस ठाण्यात निष्काळजी उपचारांमुळे मृत्यू या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.