केरळचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ मार्क्सवादी नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचे निधन
तिरुवनंतपुरम: केरळचे माजी मुख्यमंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचे वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले. सीपीआय (एम) ने त्यांच्या निधनाची अधिकृत घोषणा केली आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना 23 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी मुख्यमंत्री पिनारायी विजयन, अर्थमंत्री के.एन. बालगोपाल, आणि इतर पक्षनेत्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. जानेवारी 2021 मध्ये प्रशासकीय सुधारणा समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून ते तिरुवनंतपुरम येथे आपल्या कुटुंबासोबत राहत होते.
हेही वाचा -मोठी दुर्घटना टळली! एअर इंडियाचे विमान धावपट्टीवर घसरले, 3 टायर फुटले
अच्युतानंदन यांचा राजकीय प्रवास
व्ही.एस. अच्युतानंदन हे केरळच्या राजकारणातील एक बुलंद आवाज होते. त्यांनी 10 निवडणुका लढवल्या. यात ते 7 वेळा विजयी झाले. व्ही.एस. अच्युतानंदन यांनी 2006 ते 2011 या कालावधीत केरळचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला. कामगार हक्क, सामाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. 1964 मध्ये कम्युनिस्ट पक्ष फुटल्यानंतर, त्यांनी सीपीआय (एम) या नव्या पक्षाच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली होती.
अच्युतानंदन यांची सामाजिक न्याय, भ्रष्टाचार विरोधी मोहिमा, आणि पर्यावरण संरक्षण या मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका होती. व्ही.एस. अच्युतानंदन हे शिस्तप्रिय, निर्भीड आणि निष्ठावान नेता म्हणून ओळखले जात असतं. केरळमध्ये त्यांच्या कार्यामुळे अनेक सामाजिक सुधारणा घडून आल्या. ते केरळच्या कम्युनिस्ट चळवळीतील एक दैदिप्यमान व्यक्तिमत्त्व होते.