Vaishno Devi Yatra: नवरात्रीपूर्वी भाविकांसाठी आनंदाची बातमी! 'या' दिवसापासून सुरू होणार माता वैष्णोदेवी यात्रा
Vaishno Devi Yatra: गेल्या 17 दिवसांपासून स्थगित असलेली श्री माता वैष्णोदेवी यात्रा आता पुन्हा सुरू होणार आहे. खराब हवामान आणि पवित्र मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर आवश्यक देखभालीमुळे तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर, श्राइन बोर्डाने नवरात्रीपूर्वी यात्रा सुरू करण्याची घोषणा केली आहे. यात्रेची सुरुवात रविवार, 14 सप्टेंबरपासून होणार आहे.
श्राइन बोर्डाच्या सूचनेनुसार, यात्रेकरूंनी प्रवासादरम्यान वैध ओळखपत्र बाळगणे अत्यावश्यक आहे. तसेच, निर्धारित मार्गांचे पालन करणे आणि ग्राउंड स्टाफला सहकार्य करणे आवश्यक आहे. यात्रेकरूंना सुरक्षितता आणि व्यवस्थापनासाठी RFID-आधारित ट्रॅकिंग कार्ड वापरणे बंधनकारक असेल.
भक्तांना मार्गदर्शनासाठी, लाईव्ह अपडेट्स, बुकिंग सेवा आणि हेल्पलाइनसाठी www.maavaishnodevi.org या अधिकृत वेबसाइटवर भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. श्राइन बोर्डाने तात्पुरत्या स्थगिती दरम्यान भक्तांनी दाखवलेल्या संयम आणि समजूतदारपणाबद्दल आभारही व्यक्त केले आहेत. दरम्यान, माता वैष्णोदेवी यात्रा 17 दिवसांसाठी स्थगित करण्यात आली होती. जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील माता वैष्णोदेवी मंदिराची यात्रा 26 ऑगस्ट रोजी ढगफुटीमुळे झालेल्या भूस्खलनानंतर थांबवण्यात आली होती. या अपघातात 34 यात्रेकरू मृत्यूमुखी पडले आणि 20 जण जखमी झाले होते.
गुहा मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील बहुतेक दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यामुळे शनिवारी किंवा रविवारी तीर्थयात्रा पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा होती. श्राइन बोर्डाने यात्रेबाबत नियमित अपडेट्स जारी करत भक्तांना तयारी करण्यास सांगितले आहे. श्री माता वैष्णोदेवी यात्रेची सुरुवात झाल्याने भक्तांना नवरात्रीपूर्वी मंदिराची दर्शन घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.