सरकारने बदलले मधुमेह आणि संसर्गजन्य औषधांसह 71 औषधांचे दर; काय आहेत नवीन किमती?
नवी दिल्ली: केंद्र सरकारने 71 अत्यावश्यक औषधांच्या किमतीत बदल करत रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. यामध्ये कर्करोग, मधुमेह, पोटाचे विकार, अल्सर आणि गंभीर संसर्ग यांसारख्या आजारांवरील औषधांचा समावेश आहे. राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरण (NPPA) ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या औषधांची नवीन कमाल किंमत निश्चित करण्यात आली असून त्यावर जीएसटी वेगळा आकारला जाईल.
महत्वाच्या औषधांच्या किमतीत मोठा बदल -
कर्करोगाचे औषध: रिलायन्स लाईफ सायन्सेसचे Trastuzumab, जे स्तन व पोटाच्या कर्करोगासाठी वापरले जाते, आता ते प्रति कुपी 11,966 रुपयांमध्ये उपलब्ध असेल.
अल्सरचे औषध: तीन वेगवेगळ्या औषधांचे मिश्रण करून बनवलेले टोरेंट फार्मास्युटिकल्सचे पेप्टिक अल्सर औषध आता प्रति गोळी 162.5 रुपयांना उपलब्ध असेल.
संसर्गावरील औषधे: संसर्गांवर उपचार करण्यासाठी वापरले जाणारे कॉम्बीपॅक औषध प्रति कुपी 626 रुपयांना उपलब्ध असेल, तर तत्सम आणखी एक औषध प्रति कुपी 515.5 रुपयांना उपलब्ध असेल. या किमती निश्चित केल्याने रुग्णांना आवश्यक औषधे योग्य किमतीत मिळण्यास मदत होईल.
मधुमेहाच्या औषधांच्या किमतींमध्येही बदल
याशिवाय, मधुमेहावरील औषधांच्या किमतीतही बदल करण्यात आले आहेत. Sitagliptin व Empagliflozin असलेल्या 25 हून अधिक मधुमेहविरोधी औषधांच्या किमती निश्चित करण्यात आल्या आहेत. यामुळे मधुमेह रुग्णांना औषधे अधिक स्वस्तात उपलब्ध होतील.
औषध विक्रेत्यांना सूचना -
दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात NPPA ने सर्व औषध उत्पादकांना त्यांच्या नवीन किमतींची यादी राज्य औषध नियंत्रक, विक्रेते व सरकारसोबत शेअर करण्याचे आदेश दिले होते. तसेच, प्रत्येक विक्रेत्याला दुकानात नवीन दरांची स्पष्ट यादी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा नियम ऑनलाइन विक्रेत्यांनाही लागू आहे, जेणेकरून ग्राहकाला पारदर्शक माहिती मिळेल.
हेही वाचा - Drug Racket Bust: ड्रग्ज सिंडिकेटचा मास्टरमाइंड ताहेर डोला अखेर अटकेत
एनपीपीए म्हणजे काय?
राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरण (NPPA) ही भारत सरकारची संस्था आहे, जी आवश्यक औषधांची कमाल किरकोळ किंमत निश्चित करते. जेणेकरून ग्राहकांना औषधे परवडणाऱ्या दरात उपलब्ध होतील.