पंजाबमध्ये प्रेमविवाहांवर ग्रामपंचायतींची बंदी; प्रेमीयुगलांमध्ये भीतीचं वातावरण
चंदीगड: पंजाबमधील फरीदकोट, मोहाली आणि मोगा जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी एकाच गावातील व्यक्तींमधील प्रेमविवाहांवर बंदी घालण्याचा ठराव मंजूर केला आहे. प्रेमविवाह करणाऱ्यांवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच, गावकऱ्यांना मदत करणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असे ठरावात स्पष्ट करण्यात आले आहे. ग्रामपंचायतींनी असे विवाह हिंसक वाद, कौटुंबिक संघर्ष व सामाजिक सौहार्द बिघडवणारे असल्याचे सांगितले आहे. फरीदकोट जिल्ह्यातील सिरसारी, अनोखपुरा, मोहाली जिल्ह्यातील मानकपूर शरीफ, आणि मोगा जिल्ह्यातील घल कलान पंचायतींनी हे ठराव मंजूर केले आहेत.
गेल्या महिन्यात घल कलान गावातील एका महिलेवर तिचा मुलगा गावातील एका मुलीसोबत पळून गेल्याने हल्ला करण्यात आला होता. जसबीर कौरच्या मुलाचे मे महिन्यात लग्न झाले होते, त्यानंतर कुटुंबाला घर सोडण्यास भाग पाडण्यात आले होते. 21 जुलै रोजी कौर घल कलानला परतली तेव्हा मुलीच्या कुटुंबातील दोन महिलांनी तिच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणानंतर महिला आयोगाच्या हस्तक्षेपाने गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रेमविवाह केल्यास कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात येणार -
घल कलान गावाच्या पंचायतीने यापूर्वी एकाच गावातील विवाहांविरुद्ध ठराव मंजूर केला होता आणि अशा जोडप्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. मोहाली जिल्ह्यातील मानकपूर शरीफ पंचायतीने 31 जुलै रोजी असाच एक ठराव मंजूर केला होता. या ठरावात म्हटले आहे की, जर कोणताही मुलगा किंवा मुलगी त्यांच्या कुटुंबाच्या परवानगीशिवाय कोर्ट मॅरेज करेल तर त्यांना मानकपूर शरीफ किंवा जवळच्या गावात राहण्याची परवानगी दिली जाणार नाही.
हेही वाचा - Cloudburst in Uttarkashi: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी! अनेक इमारती वाहून गेल्या, पहा थरारक दृश्य
दरम्यान, या ठरावात पुढे म्हटले आहे की, जर कुटुंबातील कोणताही सदस्य किंवा गावकरी जोडप्याला मदत करताना आढळला तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. गावातील एका जोडप्याने पळून जाऊन मुलीच्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न केल्यानंतर हा ठराव मंजूर करण्यात आला होता. सरपंच दलवीर सिंह म्हणाले की, गावात सुसंवाद राखण्यासाठी हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे.
हेही वाचा - डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीम पुन्हा तुरुंगाबाहेर; 8 वर्षांत 14 वेळा पॅरोल
तथापी गलवट्टी गावातील तरुणाने कोर्ट मॅरेज केल्याने गावात परतल्यानंतर पंचायतीने त्याच्याविरोधात बहिष्कार ठराव मंजूर केला. पीडित जोडप्याने न्यायासाठी कोर्टात धाव घेतली असून न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा दिला आहे. ग्रामपंचायतींनी राज्य सरकारकडे एकाच गावातील विवाहांवर बंदी घालावी आणि या मुद्द्यावर विधानसभेत चर्चा करावी अशी मागणी केली आहे.