देशभरात आईस्क्रीमच्या विक्रीत मोठी वाढ होते. विशेष

गर्मीचा कहर! देशभरात 30 हजार कोटींच्या आईस्क्रीमचा विक्रमी खप

मुंबई: उन्हाळ्याचा मोसम आला की, सर्वात हवीहवीशी वाटणारी गोष्ट म्हणजे  आईस्क्रीम थंड पाणी आणि गारेगार उसाच्या सरबतामुळे गारवा जाणवला नाही तर सगळीच मंडळी आईस्क्रीमला पहिलं प्राधान्य देतात.  त्यामुळे, देशभरात आईस्क्रीमच्या विक्रीत मोठी वाढ होते. विशेषतः गुजरात आणि महाराष्ट्र हे राज्ये आईस्क्रीम विक्रीत आघाडीवर असून, त्यानंतर कर्नाटक, तामिळनाडू आणि दिल्लीचा क्रमांक लागतो. बदलत्या हवामानासोबतच ग्राहकांची चव आणि पसंतीही बदलत आहे. देशभरात सध्या 200 हून अधिक प्रकारच्या फ्लेवर्स उपलब्ध आहेत, आणि मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आईस्क्रीमची मागणी लक्षणीय वाढल्याचे निरीक्षण आहे. स्मॉल स्केल आईस्क्रीम मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या अहवालानुसार, या वाढत्या मागणीमुळे यंदा तब्बल 30 हजार कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे. 

गेल्या काही वर्षांत स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय ब्रँड्सनी विविध प्रयोग करत भारतीय बाजारपेठेत मोठी गुंतवणूक केली आहे. पारंपरिक फ्लेवर्ससोबतच नवनवीन चव, आरोग्यदायी पर्याय आणि नाविन्यपूर्ण पॅकेजिंगमुळे ग्राहकांचा कल अधिक वाढला आहे. थंडगार, चविष्ट आणि आरोग्यसंपन्न पर्याय उपलब्ध झाल्याने आईस्क्रीम केवळ उन्हाळ्यापुरते मर्यादित न राहता, ते आता वर्षभराचा आनंददायक पदार्थ बनला आहे. वाढती महागाई आणि उत्पादन खर्च असूनही आईस्क्रीम उद्योगाने विक्रमी वाढ साधली आहे, आणि यंदाच्या उन्हाळ्यात हा उद्योग आणखी तेजीत राहण्याची शक्यता आहे.