पाकिस्तानची तारांबळ उडणार! भारताने पाकिस्तानमधून होणारी आयात तात्काळ थांबली
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत दररोज पाकिस्तानला धक्के देत आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अटारी सीमा बंद केली. आता भारताने पाकिस्तानसोबत आयात-निर्यातही थांबवली आहे. आता, भारतासोबत आयात-निर्यात आणि व्यापार बंद झाल्यामुळे, पाकिस्तानची आर्थिक स्थिती आणखी बिकट होऊ शकते. आज 3 मे रोजी एक अधिसूचना जारी करून भारताने पाकिस्तानमधून येणाऱ्या वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली आहे. आजपासून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयातीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
व्यापार करारांवर होणार थेट परिणाम -
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) व्यापार बंद करण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. आदेशानुसार, परराष्ट्र व्यापार धोरण 2023 मध्ये 'पाकिस्तानमधून आयातीवर बंदी' असे शीर्षक असलेला एक नवीन परिच्छेद 2.20A जोडण्यात आला आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी ही बंदी घालण्यात आली आहे. यावर कोणतीही सूट भारत सरकारच्या पूर्व मंजुरीनंतरच दिली जाऊ शकते.
हेही वाचा - अतुलशास्त्री भगरे यांची धक्कादायक भविष्यवाणी; येत्या 36 तासांत भारत-पाकिस्तान युद्ध?
भारताच्या या आदेशाचा थेट परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. सुरक्षा आणि स्वावलंबनाच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश भारत सरकारने दिला आहे. दुसरीकडे, पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी, भारत आयएमएफ, जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेकडून पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय आर्थिक मदतीचे पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी करेल.
हेही वाचा - पहलगाम हल्ल्यानंतर सीमेवर तणावपूर्ण स्थिती; पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन
पाकिस्तानला देण्यात येणारी आर्थिक मदत दहशतवादाला चालना देण्यासाठी वापरली जात असल्याचा भारताचा आरोप आहे, त्यामुळे पाकिस्तानला देण्यात येणारा निधी थांबवावा, अशी मागणी भारताने केली आहे. पाकिस्तानवर आर्थिक दबाव आणण्यासाठी भारत त्याला फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) च्या 'ग्रे लिस्ट'मध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करेल. जूनमध्ये होणाऱ्या FATF बैठकीत भारत ही मागणी करणार आहे.