PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा आत्मनिर्भरतेवर भर; "देशाचा खरा शत्रू म्हणजे परावलंबन"
भावनगर (गुजरात) येथे आयोजित जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या आत्मनिर्भरतेचा मुद्दा ठळकपणे मांडला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, भारताला जगात कुणाशी वैर नाही, परंतु आपला खरा शत्रू म्हणजे इतर देशांवरील परावलंबन आहे.
मोदी म्हणाले, “आपल्याला सर्वात मोठा धोका आपल्या परावलंबनामुळे आहे. हा शत्रू आपण सर्वांनी मिळून हरवला पाहिजे. जेवढे परावलंबन वाढेल तेवढे अपयश ओढवते. 140 कोटी लोकसंख्येच्या या देशाने जगाच्या शांतता आणि समृद्धीसाठी आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे.”
हेही वाचा - Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांनी गयामध्ये पितृपक्षात पिंडदान करून पूर्वजांना दिली श्रद्धांजली
त्यांच्या या भाषणाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा उल्लेख केला जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच H-1B व्हिसा अर्जांसाठी 1 लाख डॉलरचे अतिरिक्त शुल्क लावले आहे. 21 सप्टेंबरपासून लागू होणारा हा निर्णय भारतासाठी महत्त्वाचा मानला जातो, कारण 70 टक्क्यांहून अधिक H-1B व्हिसाधारक भारतीय आहेत. याशिवाय अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लावलेले 50 टक्क्यांचे जास्तीचे शुल्क अजूनही कायम आहे.
हेही वाचा - IAF MiG-21 : सहा दशकांचा प्रवास संपणार; मिग-21 ला देणार अखेरचा सलाम
मोदींनी आत्मनिर्भर भारताला स्वाभिमानाशी जोडत म्हटले, “आपला स्वाभिमान टिकवायचा असेल तर परावलंबन सोडावे लागेल. आपल्या भावी पिढ्यांचे भविष्य आपण इतरांवर सोपवू शकत नाही. शंभर दु:खांवर एकच उपाय आहे तो म्हणजे आत्मनिर्भर भारत.”
सभेत त्यांनी काँग्रेसवरही टीका केली. जहाजबांधणी उद्योगाच्या घसरणीसाठी त्यांनी काँग्रेसला जबाबदार धरले. “आपल्या 90 टक्के परकीय व्यापारासाठी आपण अजूनही परदेशी जहाजांवर अवलंबून आहोत. जहाजबांधणी उद्योगाला चालना देण्याऐवजी काँग्रेसने परदेशी जहाजांना प्राधान्य दिले आणि त्यामुळे भारतात हा उद्योग जवळपास संपला. आज आपण दरवर्षी जवळपास 6 लाख कोटी रुपये परदेशी शिपिंग सेवांवर खर्च करतो, जे आपल्या संरक्षण खर्चाइतकेच आहे,” असे मोदी म्हणाले. या दौऱ्यात पंतप्रधानांनी 34200 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी केली तसेच मुंबईतील इंदिरा डॉक येथील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचे उद्घाटनही केले.