India-Pakistan Map History : नकाशा तयार करणाऱ्याने कधीच पाहिला नव्हता भारत देश ; नंतर बसला धक्का कारण...
नवी दिल्ली: आज भारत देश 79वा स्वातंत्र्यदिवस साजरा करत आहे. आजपासून 78 वर्षांपूर्वी जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला आणि त्याचे भारत आणि पाकिस्तान असे दोन भाग होणार होते, तेव्हा भारत आणि पाकिस्तानमधील सीमा रेखाटण्याचे काम एक अशा व्यक्तीला सोपवण्यात आले होते, ज्याने कधीही भारतीय भूमीवर पाऊल ठेवले नव्हते. या व्यक्तीचे नाव होते सिरिल रॅडक्लिफ.
सिरिल रॅडक्लिफ यांनी कधीही भारत देश पाहिला नव्हता
ब्रिटनचे प्रसिद्ध वकील सर सिरिल रॅडक्लिफ यांना सीमा आयोगाचे प्रमुख बनवण्यात आले होते. 17 कोटींची लोकसंख्या असलेल्या या देशाचा नकाशा तयार करण्यासाठी सिरिल रॅडक्लिफ यांना ब्रिटिश सरकारने फक्त 5 आठवडे दिले होते. या दरम्यान, एका बाजूला भारत आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तान हा नवीन देश निर्माण व्हावा म्हणून हिंदू आणि मुस्लिम बहुल भागांच्या आधारांवर पंजाब आणि बंगालचे विभाजन करण्याचे काम रॅडक्लिफ यांना देण्यात आले होते. पण समस्या अशी होती की रॅडक्लिफ यांना भारताच्या भूगोलाचा सखोल अभ्यास नव्हता आणि त्यांना सांस्कृतिक पार्श्वभूमीचे ज्ञान नव्हते.
सीमा तयार करणे हे अत्यंत गुंतागुंतीचे काम होते
रॅडक्लिफ यांच्याकडे जी माहिती होती ती बहुतांश जुनी माहिती होती. यासह, जनगणना नोंदी आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या अहवालांवर आधारित होती. इतकंच नाही तर सिरिल रॅडक्लिफ यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागला होता, जिथे धर्माच्या आधारावर फूट पाडण्याचे प्रयत्न केले जात होते. मात्र, प्रत्यक्षात गावे, शहरे आणि जिल्हे सर्व मिश्र लोकसंख्या असलेले होते. कधी हिंदू बहुल गावाच्या मध्यभागी एक मुस्लिम गाव असायचे, तर कधी मुस्लिम बहुल भागात हिंदू वस्ती असायची. अशा परिस्थितीत, सीमारेषेची रचना करणे हे अतिशय गुंतागुंतीचे आणि संवेदनशील काम बनले.
सीमा तयार झाल्यावर दंगली झाल्या
17 ऑगस्ट 1947 रोजी रॅडक्लिफ रेषा (Radcliffe line) जाहीर करण्यात आली. स्वातंत्र्य झाल्याच्या दोन दिवसानंतर हा नकाशा प्रसिद्ध करण्यात आला, जेणेकरून हिंसाचार आणि अशांतता रोखता येईल. मात्र, निकाल उलटला. रॅडक्लिफ यांनी काढलेल्या या सीमारेषेमुळे एकाच वेळी लाखो लोक दुसऱ्या देशाचे नागरिक झाले. या दरम्यान, पंजाब आणि बंगालमध्ये दंगली झाल्या. इतकच नाही, तर मृतदेहांनी भरलेल्या गाड्या येऊ लागल्या, गावे जळू लागली आणि या हिंसाचारात सुमारे 10 ते 15 लाख लोक मृत्युमुखी पडले.
हेही वाचा: Independence Day 2025: नवा विक्रम! पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लाल किल्ल्यावर आज 12वे भाषण
रॅडक्लिफ यांना धक्का बसला
जेव्हा ही घटना घडली तेव्हा रॅडक्लिफ यांना मोठा धक्का बसला होता. भारत देश सोडण्यापूर्वी त्यांनी आपली सर्व कागदपत्रे जाळून टाकली, जेणेकरून त्यांनी घेतलेल्या निर्णयावर कोणताही वाद होऊ नये. त्यानंतर, त्यांनी मान्य केले की जर त्यांनी या कामाचे गांभीर्य आणि त्याचे परिणाम माहित असते तर कदाचित ते हे काम करण्यास कधीच तयार झाले नसते.