भारताने म्हटले आहे की, अमेरिकेच्या या निर्णयाचे का

India Responds H1B Visa Fees : 'हा केवळ स्थलांतरणाचा मुद्दा नाही,' अमेरिकेला आठवण करून देत भारताने मांडली भूमिका

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-1 बी व्हिसासाठी शुल्क तब्बल $100,000 (सुमारे 88 लाख रुपये) पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प (Donald Trump) यांनी एच-1बी व्हिसाच्या (H1B Visa) शुल्कात मोठी वाढ करत ते 10 पट केले आहे. यावर आता भारताने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हा निर्णय केवळ स्थलांतरणाशी संबंधित नसून, दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांसाठी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठी महत्त्वाचा असल्याचे भारताने अमेरिकेला सांगितले आहे.

भारताची नेमकी प्रतिक्रिया काय? भारताने म्हटले आहे की, अमेरिकेच्या या निर्णयाचे काय परिणाम होऊ शकतात, याचे मूल्यांकन सुरू आहे. तसेच, या निर्णयामुळे तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रात होत असलेल्या बदलांवर भारत बारीक नजर ठेवून आहे. वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासातील अधिकारी अमेरिकन अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, "एच-1 बी व्हिसावरील शुल्क वाढीच्या निर्बंधांच्या अहवालाचा काळजीपूर्वक अभ्यास केला जात आहे. भारतीय उद्योगांकडूनही प्राथमिक विश्लेषण आले आहे, ज्यामुळे अनेक गैरसमज दूर होण्यास मदत मिळाली आहे." त्यामुळे आता चर्चेद्वारे पुढील मार्ग निघण्याची अपेक्षा असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. अमेरिकेच्या या निर्णयावर बोलताना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल (Randhir Jaiswal) म्हणाले की, "भारत सरकारने अमेरिकेच्या एच-1बी व्हिसा कार्यक्रमावर प्रस्तावित निर्बंधांशी संबंधित अहवाल पाहिले आहेत. आम्ही या निर्णयाचा सखोल अभ्यास करत आहोत. यामुळे दोन्ही देशांमधील उद्योगांवर परिणाम होऊ शकतो." जयस्वाल यांनी असेही म्हटले की, सरकारला आशा आहे की, अमेरिकन अधिकारी या अडचणींवर योग्य तोडगा काढतील.

हेही वाचा - PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा आत्मनिर्भरतेवर भर; "देशाचा खरा शत्रू म्हणजे परावलंबन"

परस्पर संबंधांवर भर भारताने अमेरिकेला आठवण करून दिली आहे की, कुशल मनुष्यबळाच्या देवाणघेवाणीमुळे दोन्ही देशांना तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था आणि संपत्ती निर्मितीमध्ये मोठा फायदा झाला आहे. त्यामुळे एच-1 बी व्हिसाबाबत धोरण ठरवताना दोन्ही देशांमधील परस्पर संबंध आणि लोकांमधील मजबूत संबंध लक्षात घेऊन पावले उचलावीत, असे भारताने म्हटले आहे.

ट्रम्प यांच्या निर्णयामागे काय? ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाला भारतीय टॅलेंट अमेरिकेत येण्यापासून रोखण्याचा एक प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. यापूर्वी, जवळपास ७१% टॅलेंटला अमेरिकेत जाण्याची संधी मिळत होती, पण आता या नव्या नियमांमुळे अनेक तरुणांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. दुसरीकडे, काही तज्ज्ञांच्या मते, यामुळे भारतातच मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात. हे तज्ज्ञ अमेरिकेच्या या निर्णयाकडे संकट म्हणून नाही तर, संधी म्हणून पाहत आहेत.

हेही वाचा - H-1B Visa: '24 तासांच्या आत अमेरिकेत परत या...' मायक्रोसॉफ्टचा भारतीय कर्मचाऱ्यांना इशारा