जपानला मागे टाकत भारत बनणार जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; IMF अहवालात खुलासा
नवी दिल्ली: भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाची बातमी आहे. 2025 मध्ये भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने जारी केलेल्या एप्रिल 2025 च्या जागतिक आर्थिक दृष्टिकोन अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालात म्हटले आहे की, 2025 मध्ये भारताचा नाममात्र जीडीपी 4,187.017 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढेल. त्याच वेळी, जपानचा जीडीपीचा आकार 4,186.431 अब्ज डॉलर असण्याचा अंदाज आहे. भारत सध्या जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. जीडीपीमध्ये अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपान भारताच्या पुढे आहेत.
2027 पर्यंत भारत 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनू शकतो -
आयएमएफच्या अंदाजानुसार, येत्या काही वर्षांत भारत जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो. 2027 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडू शकते. 2028 पर्यंत, भारताचा जीडीपी 5,584.476 अब्ज डॉलर असेल, तर या काळात, जर्मनीचा जीडीपी आकार 5,251.928 अब्ज डॉलर असण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा - 'देशात आरक्षण रेल्वेच्या डब्यासारखे आहे...'; सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी
भारताचा जीडीपी विकास दर 6.2 टक्के राहण्याचा अंदाज -
दरम्यान, आयएमएफच्या अंदाजानुसार जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था, अमेरिका आणि चीन, 2025 पासून सुमारे एक दशकासाठी त्यांचे रँकिंग कायम ठेवू शकतात. आयएमएफने 2025 साठी भारताचा जीडीपी विकास दर 6.2 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. जानेवारीच्या आउटलुक अहवालात याआधी हा आकडा 6.5 टक्के होता.
भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था -
आयएमएफच्या अहवालानुसार, भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. पुढील दोन वर्षांत 6 टक्के दराने वाढणारी ही जगातील एकमेव मोठी अर्थव्यवस्था असेल.