पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भारत-पाकिस्तान युद्धब

PM Modi On Operation Sindoor: भारत अणुशक्तीची धमकी सहन करणार नाही; पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा

PM Modi Warns Pakistan

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भारत-पाकिस्तान युद्धबंदी झाल्यानंतर पहिल्यांदाच देशाला संबोधित केले. यावेळी मोदींनी 'भारत अणुशक्तीची धमकी सहन करणार नाही,' असा कडक इशारा पाकिस्तानला दिला आहे. देशवासीयांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'सिंदूर पुसण्याची किंमत काय आहे, हे संपूर्ण जगाने पाहिले. दहशतवादी तीन दशकांपासून पाकिस्तानात फिरत होते. भारताने पाकिस्तानच्या छातीवर हल्ला केला. ऑपरेशन सिंदूर फक्त पुढे ढकलण्यात आले आहे, भविष्यात पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून कारवाई केली जाईल. भारत अणु ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही. भविष्यातही पाकिस्तानला आणखी आक्रमक पद्धतीने प्रतिउत्तर दिले जाईल,' असंही मोदी यावेळी म्हणाले. 

आता पाकिस्तानला आमच्या अटींवर उत्तर दिले जाईल - 

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही आता पाकिस्तानमधील दहशतवादी आणि लष्करी तळांवर हल्ले थांबवले आहेत. पाकिस्तानने सीमेवर हल्ला केला, पण भारताने पाकिस्तानच्या छातीवर हल्ला केला. यापुढे अणु ब्लॅकमेल सहन केले जाणार नाही. भारतावरील कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला योग्य आणि आमच्या अटींवर उत्तर दिले जाईल.

हेही वाचा -  'आम्ही पुढील मोहिमेसाठी तयार आहोत...'; एअर मार्शलचा पाकिस्तानला इशारा

आता पाकिस्तानशी फक्त पीओके आणि दहशतवादावर चर्चा होईल - 

सध्याचे युग हे युद्धाचा काळ नाही. आपली एकता ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलता हीच एका चांगल्या जगाची हमी आहे. आता पाकिस्तानशी फक्त पीओके आणि दहशतवादावरच चर्चा होईल, असंही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नमूद केलं.

हेही वाचा -  पाकड्यांची चिनी बनावटीची क्षेपणास्त्र अयशस्वी झाली; डीजीएमओच्या पत्रकार परिषदेत केलं स्पष्ट

ऑपरेशन सिंदूर हे फक्त एक नाव नाही तर लोकांच्या भावनांचे प्रतिबिंब - 

यावेळी पंतप्रधान म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर हे फक्त एक नाव नाही. हे देशातील लाखो लोकांच्या भावनांचे प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर ही न्यायाची अटळ प्रतिज्ञा आहे. 6 मे रोजी रात्री उशिरा आणि 7 मे रोजी पहाटे, संपूर्ण जगाने या प्रतिज्ञेचे परिणामांमध्ये रूपांतर होताना पाहिले आहे. आम्ही भारतीय सैन्याला दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे आणि आज प्रत्येक दहशतवाद्याला, प्रत्येक दहशतवादी संघटनेला माहित आहे की, आमच्या बहिणी आणि मुलींच्या कपाळावरील सिंदूर मिटवण्याचा परिणाम काय होतो.