India GDP Growth Rate: भारताची अर्थव्यवस्था जोमात! पहिल्या तिमाहीत जीडीपीमध्ये 7.8 टक्क्यांनी वाढ
India GDP Growth Rate: अमेरिकेच्या शुल्क धोरणांचा दबाव आणि वाढत्या भू-राजकीय तणावांच्या पार्श्वभूमीवरही भारताने दमदार आर्थिक वाढ नोंदवली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीत देशाचा सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) 7.8% दराने वाढल्याचे सरकारने जाहीर केले. गेल्या वर्षी याच कालावधीत हा दर 6.5% होता.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते जून या तिमाहीत एकूण सकल मूल्यवर्धित (GVA) 7.6% ने वाढला. सेवा क्षेत्राने यामध्ये आघाडी घेतली असून शेती आणि उत्पादन क्षेत्रांनीही चांगली कामगिरी केली आहे. स्थिर किमतींवर (Real GDP) पहिल्या तिमाहीत उत्पादनाचे मूल्य 47.89 लाख कोटी रुपये इतके होते, जे मागील वर्षाच्या 44.42 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत 7.8 टक्के वाढ दर्शवते. सध्याच्या किमतींवर हा आकडा 86.05 लाख कोटी रुपये होता, जो मागील वर्षी याच कालावधीत 79.08 लाख कोटी रुपये होता.
क्षेत्रनिहाय कामगिरी
शेती आणि संबंधित क्रिया - 3.7% वाढ (मागील वर्षी 1.5%) उत्पादन क्षेत्र - 7.7% वाढ बांधकाम क्षेत्र - 7.6 % वाढ वीज, वायू, पाणीपुरवठा आणि इतर सेवांमध्ये - 0.5 % वाढ
आर्थिक वाढीला गती
तज्ज्ञांच्या मते, सेवा क्षेत्रातील प्रगती आणि शेतीतील स्थिर कामगिरीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेने आव्हानात्मक जागतिक परिस्थितीतही मजबूत पावले टाकली आहेत. वाढता गुंतवणूक प्रवाह आणि ग्राहक मागणी हेही जीडीपी वाढीला गती देणारे घटक ठरले आहेत.