क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवल्याचे लक्षात आल्यान

Viral Video : रिक्षा की मिनीबस? पाच-सहा नाही, चक्क 19 जण कोंबून भरले.. पोलीस म्हणाले, 'पूरी फौज..!'

Autorickshaw Viral Video : जीवन यशस्वी करण्यासाठी आणि विविध अडथळ्यांवर मात करण्यासाठी 'अॅडजस्टमेंट' आवश्यक आहे, हे आपण अनेकदा ऐकत असतो. पण 'अॅडजस्टमेंट' किती करायची..? तर, आपल्याला झेपेल एवढीच.. आता प्रत्येकाची 'अॅडजस्टमेंट' करण्याची क्षमताही वेगळी असते, हेही खरं... पण रिक्षावाल्यांची 'अॅडजस्ट' करण्याची क्षमता अफाट असते, याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल.

'अॅडजस्टमेंट' तरी किती करायची.. काही प्रमाण? रिक्षावाले किती ठिकाणी 'अॅडजस्ट' करतात, हे आपल्याला माहीत आहे. रिक्षात प्रवासी भरताना 'अॅडजस्टमेंट', रिक्षा चालवताना 'अॅडजस्टमेंट', वाहतुकीचे नियम पाळताना 'अॅडजस्टमेंट', गर्दीतून विमानासारखी रिक्षा चालवताना 'अॅडजस्टमेंट', सिग्नलवर थांबताना 'अॅडजस्टमेंट'. वाहतुकीची कोंडी झालेली असताना दुचाकीवालेही संभ्रमात पडतात.. पण रिक्षावाले तिथेही 'अॅडजस्टमेंट' करून सर्वांच्या हातावर तुरी देऊन बहुतेक वेळा सहीसलामत बाहेर पडतात. अशा प्रकारांमुळे अनेकदा अपघातही होतात. ऑटो रिक्षांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवल्याचा प्रकार आपण सर्रास पाहातो. पण क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे किती प्रवासी एका तीन चाकी रिक्षामध्ये बसवावेत, याला देखील काही मर्यादा असणे आवश्यक आहे. 

हेही वाचा - ‘असा प्रसंग 40 वर्षांत कधीच पाहिला नाही.. रेल्वेची एक सूचना.. अन् झाली तुफान चेंगराचेंगरी’, हमालाने सांगितली आपबीती

'क्या देखो.. पूरी फौज' असाच एक रिक्षाचालक पोलिसांच्या तावडीत सापडला.. रिक्षा 'ओव्हरलोड' आहे, हे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी ती अडवली आणि एक-एक करून रिक्षाचालकासहित सर्वांना खाली उतरवलं. जादूगाराच्या एवढ्याशा पिशवीतून जशा अगणित, असंख्य वस्तू बाहेर येतात आणि एवढ्या सगळ्या वस्तू इतक्या छोट्या पिशवीत कशा मावल्या असतील, याचा आपण विचार करत राहतो, तसेच पोलीसही चकित झाले. कारण, या रिक्षातून रिक्षाचालकासहित चक्क 19 जण उतरले..! हे पाहून पोलिसांनाही काही सुचेना.. शेवटी ते इतकेच म्हणाले, 'क्या देखो.. पूरी फौज'

पोलिसांनी बनवला व्हिडिओ पोलिसांनी या रिक्षाचा आणि त्यातून उतरलेल्या 19 जणांचा व्हिडिओ बनवलाय आणि तो एक्सवर तुफान व्हायरल झालाय. उत्तर प्रदेशातील झाशी पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत या घटनेबद्दल माहिती दिली आहे. 15 फेब्रुवारी 2025 ला रात्री बरूआसागर पोलिसांनी तपासणीदरम्यान एका ऑटोमध्ये 19 प्रवाशांना घेऊन जाताना पकडले आहे, असे या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे. यावर नेटिझन्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

हेही वाचा - BSNL 2007 नंतर पहिल्यांदाच फायद्यात, डिसेंबर तिमाहीत कमवला 262 कोटींचा नफा

गंभीर दखल ही घटना शनिवारी (15 फेब्रुवारी)रोजी उघडकीस आली जेव्हा बारूआसागर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपासणी नाक्यावर या ऑटो रिक्षाला अचानक थांबवण्यात आले. झाशी पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. क्षेत्र अधिकारी तहरौली यांनी ऑटो चालकावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली आहे. हे लोक नेमके कुठं जात होते, याबद्दल माहिती मिळू शकली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.