Kerala Brain Eating Amoeba Cases : केरळमध्ये 'मेंदू खाणाऱ्या अमीबा'चा कहर; 19 रुग्णांचा मृत्यू, आरोग्य विभागाकडून अलर्ट
तिरुवनंतपुरम : केरळमध्ये सध्या एका आरोग्यासंबंधीच्या नव्या संकटाने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 'मेंदू खाणारा अमीबा' (Brain-eating Amoeba) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेग्लेरिया फॉवलेरी (Naegleria fowleri) या सूक्ष्मजीवामुळे होणाऱ्या दुर्मीळ संसर्गाने आतापर्यंत 19 लोकांचा बळी घेतला आहे. मेंदू खाणाऱ्या या अमीबाच्या हल्ल्यामुळे प्रायमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीस हा संसर्ग होतो. या संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे केरळच्या आरोग्य विभागाने राज्यभर सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी या गंभीर परिस्थितीची दखल घेत आढावा घेतला. सुरुवातीला कोझिकोड आणि मलप्पुरम जिल्ह्यांमध्ये या संसर्गाची काही प्रकरणे आढळून आली होती, पण आता संपूर्ण राज्यभरात ही प्रकरणे समोर येत आहेत. या आजाराने बाधित झालेल्या रुग्णांमध्ये 3 महिन्यांच्या बाळापासून ते 91 वर्षांच्या व्यक्तीपर्यंतच्या लोकांचा समावेश असल्याचे वृत्त आहे.
'प्रायमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटिस' (PAM) म्हणजे काय?
- मेंदू खाणारा अमीबा, म्हणजे नेग्लेरिया फॉवलेरी, हा एकपेशीय सजीव आहे. तो डोळ्यांना दिसत नाही, पण सूक्ष्मदर्शकाखाली त्याचे अस्तित्व दिसून येते. - हा अमीबा शरीरात फक्त नाकावाटे प्रवेश करतो आणि तिथून थेट मेंदूपर्यंत पोहोचतो. - हा अमीबा जगभरात तलाव, नद्या, जलतरण तलाव आणि गरम पाण्याच्या झऱ्यांसारख्या गोड्या पाण्यात आणि मातीमध्येही आढळतो. - 115°F (46°C) पर्यंतचे उच्च तापमान त्याच्या वाढीसाठी अनुकूल असते. - जर नदी किंवा जलतरण तलावाची देखभाल व्यवस्थित होत नसेल, तर तिथे हा अमीबा सापडण्याची शक्यता जास्त असते.
संसर्गाची प्रमुख लक्षणे हा संसर्ग झाल्यानंतर, सुरुवातीच्या टप्प्यात काही सामान्य लक्षणे दिसतात. मात्र, तो जसजसा वाढत जातो, तशी परिस्थिती गंभीर होते. - सुरुवातीची लक्षणे: डोकेदुखी, ताप, मळमळ आणि उलट्या. - गंभीर लक्षणे: मान ताठ होणे, फिट येणे, गोंधळ उडणे, भास होणे आणि बेशुद्ध पडणे. - अंतिम अवस्था: गंभीर प्रकरणांमध्ये रुग्ण कोमात जाऊ शकतो आणि लक्षणे दिसल्यानंतर साधारणपणे 1 ते 18 दिवसांत त्याचा मृत्यू होतो.
यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, या आजाराने बाधित झालेले बहुतांश रुग्ण लवकरच दगावतात, कारण यावर कोणताही प्रभावी उपचार उपलब्ध नाही. हेही वाचा - Side Effects Of Drinking Tea: जास्त चहा पिताय?, या 5 हार्मोन्सवर होऊ शकतो परिणाम