Kunal Kamra Controversy: विधानभवनातल्या राड्यानंतर कुणाल कामरानं डिवचलं
मुंबई: बुधवारी, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद-विवाद झाला. त्यानंतर, गुरुवारी सायंकाळी चक्क विधानभवनाच्या लॉबीत गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांचे समर्थक एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचे पाहायला मिळाले. यावर, वादग्रस्त कॉमेडी करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या कुणाल कामराने उपरोधिक कविता करत सरकारला डिवचलं आहे.
इतकच नाही, तर 'होंगे नंगे चारो ओर, करेंगे दंगे चारो ओर', अशा शब्दात कुणाल कामराने हायुती सरकारवर टीका केली आहे. यासह, त्याने हाणामारीच्या घटनेचा व्हिडीओ एडिट करून उपरोधिक कविता एक्सवर पोस्ट केली आहे. 'कायदा मोडणारे', असं कॅप्शन देत कुणाल कामराने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांचे समर्थक एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर, पुढे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील झलक पाहायला मिळत आहे.
नेमकं प्रकरण काय?
राजकारणातील प्रतिष्ठित ठिकाणांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विधानभवनात गुरुवारी सायंकाळी दोन पक्षात तुफान हाणामारी झाली. बुधवारी, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद-विवाद झाला. त्यानंतर, गुरुवारी चक्क विधानभवनाच्या लॉबीत गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांचे समर्थक एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचे पाहायला मिळाले.
गुरुवारी सायंकाळी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केल्याने जितेंद्र आव्हाडांनी मध्यरात्री 3 वाजेपर्यंत विधानभवनाबाहेर जोरदार निदर्शने केली. या निदर्शनात आमदार रोहित पवार आणि अनेक कार्यकर्तेही आव्हाडांसोबत सामील झाले. यादरम्यान, शरद पवार गटाचे नेते असा दावा करतात की, 'विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले की त्यांचे समर्थक नितीन देशमुख यांना कालचे कामकाज संपल्यानंतर सोडण्यात येईल'. मात्र, पोलिसांनी दोन्ही संबंधित पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांना स्थानिक पोलिस ठाण्यात नेण्यात आले. यामुळे संपूर्ण परिस्थिती आणखी चिघळली आणि मध्यरात्री निषेध झाला. त्यामुळे, जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मरीन ड्राइव्ह आणि आझाद मैदान पोलिस ठाण्यासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. 'लोकशाहीत आवाज उठवण्याचे आमचे अधिकार हिरावले जात आहेत', 'सरकारचे पोलिस दडपशाही करतात', अशा घोषणा होऊ लागल्या. या प्रकरणामुळे, विधानभवन परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.