पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोठी कारवाई! काश्मीरमध्ये 1450 जणांना घेण्यात आलं ताब्यात
पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर, सुरक्षा दलांनी दक्षिण काश्मीरमध्ये 250 हून अधिक ओव्हर ग्राउंड वर्कर्स (OGW) यांना ताब्यात घेतले आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी इतर सुरक्षा एजन्सींच्या सहकार्याने सुरू केलेल्या सखोल चौकशी मोहिमेचा भाग म्हणून या लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय, काश्मीरमध्ये दहशतवादाशी संबंधित प्रकरणांमध्ये आरोपी असलेल्या सुमारे 1200 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. एकूण 1450 लोकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ला शक्य करणाऱ्या नेटवर्कची ओळख पटवणे हा यामागचा उद्देश आहे. अतिरेकी कामगारांनी हल्लेखोरांना लॉजिस्टिक किंवा गुप्तचर मदत पुरवली असे मानले जात आहे. मात्र, अद्याप त्यांची विशिष्ट भूमिका अद्याप समजलेली नाही.
पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी सीसीएसची बैठक -
दरम्यान, पंतप्रधान निवासस्थानी सीसीएसची बैठक सुरू असून या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल उपस्थित आहेत. या बैठकीत दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. तसेच विशिष्ट रणनीती आखून भारत पाकिस्तानला प्रतिउत्तर देऊ शकतो.
हेही वाचा - योग्य उत्तर देऊ...; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर राजनाथ सिंह यांचे महत्त्वपूर्ण विधान
पहलगाम दहशतवादी हल्ला -
मंगळवारी दुपारी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात 26 जणांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना मारण्यापूर्वी त्यांचा धर्म आणि नाव विचारले. दहशतवाद्यांनी त्या पुरूषांचे पँटही काढले आणि त्यांचे गुप्तांग तपासले. हे करण्यामागील दहशतवाद्यांचा हेतू पर्यटकांचा धर्म जाणून घेणे हा होता. दहशतवाद्यांच्या या कृत्यामुळे संपूर्ण देशात संताप व्यक्त होत असून लोक सरकारला दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन करत आहेत.