PM Modi In Manipur: 'मणिपूर भारतमातेच्या मुकुटावरील रत्न...'; इंफाळमध्ये पंतप्रधान मोदींचे वक्तव्य
PM Modi In Manipur: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर असून त्यांनी येथे अनेक महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांचा शुभारंभ आणि पायाभरणी केली. इम्फाळमधील जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, आज मणिपूरच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू झाले आहेत. हे प्रकल्प पायाभूत सुविधा मजबूत करतील, रोजगारनिर्मिती करतील आणि नागरिकांचे जीवनमान सुधारतील. यावेळी त्यांनी विशेषतः दोन प्रकल्पांवर भर दिला, मणिपूर शहरी रस्ते प्रकल्प आणि मणिपूर इन्फोटेक विकास प्रकल्प. यामुळे इम्फाळमधील रस्ते सुधारतील तसेच तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन संधी निर्माण होतील.
विकास आणि जनजीवन सुधारणा
पंतप्रधान मोदी म्हणाले की, 2014 पूर्वी मणिपूरचा विकास दर 1 टक्के पेक्षा कमी होता, मात्र आता राज्य झपाट्याने प्रगती करत आहे. पुराच्या समस्यांवर उपाययोजना, मणिपुरी नागरिकांसाठी कोलकाता आणि दिल्ली येथे मणिपूर भवन, परवडणारी घरे आणि सुरक्षित निवास याबाबत त्यांनी सरकारची वचनबद्धता अधोरेखित केली.
जीएसटी दर कपात आणि पर्यटनाला चालना
मोदींनी सांगितले की, सरकारने जीएसटी दर कमी केले आहेत, ज्यामुळे सिमेंट, बांधकाम साहित्य तसेच हॉटेल्समधील अन्नपदार्थ स्वस्त होतील. याचा फायदा स्थानिक व्यवसायांना, गेस्ट हाऊस, टॅक्सी आणि ढाबा मालकांना होईल आणि पर्यटनालाही गती मिळेल.
महिला सक्षमीकरणावर भर
मोदींनी इमा कैथेल बाजारपेठेची परंपरा अधोरेखित करत सांगितले की, महिला मणिपूरच्या अर्थव्यवस्थेची आधारस्तंभ आहेत. त्यांनी सांगितले की, सरकारने महिलांसाठी विशेष हाट बाजार आणि इमा बाजार तयार केले असून आज चार नवीन इमा बाजारांचे उद्घाटन झाले आहे.
हेही वाचा - Bomb Threat at Taj Palace: दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षेत वाढ
हिंसाचाराबाबत चिंता
दरम्यान, मणिपूरमधील हिंसाचाराबाबत बोलताना मोदी म्हणाले, मणिपूर हे भारतमातेच्या मुकुटातील रत्न आहे. कोणत्याही प्रकारचा हिंसाचार हा दुर्दैवी आहे आणि तो आपल्या पूर्वजांवर व भावी पिढ्यांवर अन्याय आहे. आपल्याला एकत्र शांतता आणि विकासाच्या मार्गाने पुढे जायचे आहे. या दौऱ्यातील प्रकल्पांमुळे मणिपूरच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.