मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट! खरीप पिकांवरील MSP वाढवली
नवी दिल्ली: शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 2025-26 च्या खरीप हंगामासाठी धानाच्या किमान आधारभूत किमतीत 69 रुपयांनी वाढ करून ती 2369 रुपये प्रति क्विंटल करण्यास मान्यता दिली आहे. याबाबत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या 10-11 वर्षात खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत मोठी वाढ झाली आहे. यावेळी 2025-26 च्या खरीप विपणन हंगामासाठी किमान आधारभूत किमतीला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
अश्विनी वैष्णव यांनी यांनी सांगितले की, यासाठी एकूण रक्कम सुमारे 2,07,000 कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे. डाळींबद्दल बोलायचे झाले तर, 2025-26 च्या खरीप हंगामासाठी तूरची किमान आधारभूत किंमत 450 रुपयांनी वाढवून 8 हजार रुपये प्रति क्विंटल, उडीद 400 रुपयांनी वाढवून 7,800 रुपये प्रति क्विंटल आणि मूग 86 रुपयांनी वाढवून 8,768 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे.
हेही वाचा - पाटण्यातील नवीन विमानतळ, पहलगामच्या पीडितांची भेट...; पंतप्रधान मोदी 3 दिवसांत करणार 5 राज्यांचा दौरा
गेल्या वर्षीच्या तुलनेत किमान आधारभूत किंमतीत सर्वाधिक वाढ नाचणी, कापूस आणि तीळ यासाठी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. 2025-26 च्या खरीप पिकांच्या आधारभूत किंमतीत वाढ ही केंद्रीय अर्थसंकल्प 2018-19 च्या अनुरूप आहे, ज्यामध्ये किमान आधारभूत किंमत उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट असल्याची घोषणा करण्यात आली होती.
हेही वाचा - पंतप्रधान मोदींनी भेट दिलेले बिकानेरमधील करणी माता मंदिर खास का आहे? काय आहे इतिहास?
व्याज अनुदान योजनेला मंजुरी -
दरम्यान, अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्रिमंडळाने व्याज अनुदान योजनेला मंजुरी दिली आहे. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना किसान क्रेडिट कार्ड सुरू करण्यात आले होते. यामुळे शेतकऱ्यांना खेळते भांडवल मिळवणे खूप सोपे झाले. व्याज अनुदान योजनेद्वारे खेळत्या भांडवलाचा खर्च कमी करण्यात आला आहे. प्रभावीपणे, शेतकऱ्यांना 4% व्याजदराने 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज/भांडवल सुनिश्चित करण्याची योजना आहे.