Pets Fight Divorce Case : ..ज्या कारणासाठी एकत्र आले, त्याच कारणाने घटस्फोटासाठी अर्ज! पाळीव प्राण्यांमुळे नातं तुटण्याची वेळ
भोपाळ : आजकाल घटस्फोटाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. मोबाइलचा अतिवापर, विभक्त राहण्याची मानसिकता, आणि आवडी-निवडीतील फरक यांसारखी अनेक कारणे यासाठी दिली जातात. पण मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये समोर आलेले एक घटस्फोटाचे प्रकरण मात्र खूपच वेगळे आहे. प्राण्यांच्या प्रेमामुळे एक जोडपे विभक्त होण्याचा निर्णय घेत आहे. या प्रकरणात पाळीव प्राण्यांमधील संघर्ष त्यांच्या नात्यालाच तडा देत आहे.
प्राणीमित्र जोडप्याची लव्हस्टोरी हे पती-पत्नी दोघेही अभियंते आहेत. एका प्राणी वाचवा आंदोलनात त्यांची पहिल्यांदा ओळख झाली. मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि डिसेंबर 2024 मध्ये त्यांनी लग्न केले. पत्नी उत्तर प्रदेशहून आपल्या पाळीव मांजरीसोबत पतीच्या भोपाळमधील घरी राहायला आली. पतीकडे आधीपासूनच एक कुत्रा, एक ससा आणि फिश टँक होता. लग्नानंतर सुरुवातीचे दिवस चांगले गेले, पण त्यांचे पाळीव प्राणी मात्र एकमेकांशी जुळवून घ्यायला तयार नव्हते.
पाळीव प्राण्यांचे भांडण पोहोचले न्यायालयात पत्नीचा आरोप आहे की, पतीचा कुत्रा तिच्या मांजरीवर सतत भुंकत असतो, ज्यामुळे ती घाबरून जाते आणि कधी कधी जेवतही नाही. तर, पतीचा आरोप आहे की, पत्नीची मांजर अतिशय आगाऊ आहे. ती फिशटँकमधील माशांना खाण्याचा प्रयत्न करते आणि दिवसभर ‘म्याऊं-म्याऊं’ करत घरात गोंधळ घालते.
या पाळीव प्राण्यांमधील संघर्षाचा परिणाम या जोडप्याच्या नात्यावर झाला आणि त्यांनी शेवटी भोपाळ कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. आता समुपदेशक शैल अवस्थी यांच्यासमोर त्यांचे समुपदेशन सुरू आहे.
‘मांजरीमुळे वेगळं व्हायचं आहे’ पहिल्या बैठकीत पतीने सांगितले की, पत्नीच्या मांजरीमुळे त्याला आपल्या पाळीव प्राण्यांना घेऊन वेगळे राहायचे आहे. तर पत्नीनेही आपली मांजर उदास असताना पाहू शकत नसल्याचे सांगितले. कुटुंब समुपदेशक शैल अवस्थी यांनी सांगितले की, या दोघांच्या लग्नाला फक्त आठ महिने झाले आहेत. त्यांच्यातील गैरसमज दूर करून त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. दसऱ्यानंतर त्यांची दुसरी बैठक होणार असून, त्यात या प्रकरणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल.