'ऑपरेशन सिंदूर अजून सुरूच आहे...'; शस्त्रसंधी उल्लंघनानंतर भारतीय हवाई दलाची मोठी घोषणा
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमध्ये शनिवारी युद्धबंदी झाली. गेल्या काही दिवसांत भारताने पाकिस्तान आणि त्याच्या दहशतवादी तळांवर अशी कारवाई केली आहे की, ती पाकिस्तानच्या दीर्घकाळ लक्षात राहील. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारताने प्रथम पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. तसेच पाकिस्तानमधील 11 हवाई तळही उद्ध्वस्त केले. भारताच्या या मोहिमेत देशाच्या हवाई दलानेही मोठी भूमिका बजावली आहे. आता हवाई दलाने या कारवाईबाबत एक निवेदन जारी केले आहे.
पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या आपत्कालीन बैठकीनंतर, भारतीय हवाई दलाने त्यांच्या एक्स हँडलवर ट्विट करून ऑपरेशन सिंदूर सुरू ठेवण्याची घोषणा केली. ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाई दलाने (IAF) आपले लक्ष्य अचूकतेने यशस्वीरित्या गाठले. राष्ट्रीय उद्दिष्टांच्या अनुषंगाने हे ऑपरेशन विचारपूर्वक आणि विवेकपूर्णपणे पार पाडण्यात आले. ऑपरेशन अजूनही सुरू असल्याने, सविस्तर माहिती वेळोवेळी दिली जाईल. आयएएफ सर्वांना अपील करते की त्यांनी अंदाज लावणे आणि पडताळणी न केलेली माहिती पसरवणे टाळावे.'
हेही वाचा - युद्धबंदीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे आणखी एक विधान; म्हणाले, 'काश्मीरवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार
दरम्यान, शनिवारी संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धबंदी आणि रात्रीच्या वेळी झालेल्या युद्धबंदीच्या उल्लंघनानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक बोलावली. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सीडीएस अनिल चौहान, परराष्ट्र मंत्री जयशंकर, एनएसए अजित डोभाल, आयबी-रॉ प्रमुख, लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह आणि नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी उपस्थित होते. सुमारे 2 तास चाललेल्या बैठकीनंतर, हवाई दलाने ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असल्याचं म्हटलं आहे.
हेही वाचा - ऑपरेशन सिंदूरचं सर्वात मोठं यश; भारतीय हल्ल्यातील टॉप 5 दहशतवादी ठार
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन -
पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने 7 मे ला ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानवर हवाई हल्ला केला. यानंतर घाबरलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. त्यानंतर पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यात आला. भारताने पाकिस्तानी सैन्याचा प्रत्येक हल्ला हाणून पाडला. त्यानंतर 10 मे रोजी संध्याकाळी दोन्ही देशामध्ये युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. परंतु, शनिवारी संध्याकाळी पाकिस्तानने पुन्हा गोळीबार करत युद्धबंदीचे उल्लंघन केले.