भारतीय सैन्याचं एअर स्ट्राईक, 9 दहशतवादी तळ उध्वस्त; पंतप्रधान मोदी स्वत: मॉनिटर करत होते 'ऑपरेशन सिंदूर'
नवी दिल्ली: भारतीय लष्कराने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्ड्यांवर जोरदार हल्ला चढवत 'ऑपरेशन सिंदूर' यशस्वीपणे पार पाडले आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूड घेत भारतीय हवाई दलाने मध्यरात्री 1:30 वाजता एकाचवेळी नऊ ठिकाणी हवाई कारवाई करत अतिरेक्यांचे प्रशिक्षण केंद्र व तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईत जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन यांचे कॅम्प्स लक्ष्य केले गेले.
या हवाई कारवाईदरम्यान भारतीय सेनेने कोणत्याही पाकिस्तानी नागरी ठिकाणांना किंवा अधिकृत लष्करी ठिकाणांना धक्का न लावता केवळ दहशतवाद्यांचे केंद्रबिंदूच लक्ष्य केले. बहावलपूर, मुझफ्फराबाद आणि कोटली येथील दहशतवादी तळ यामध्ये मोडीत काढण्यात आले. विशेष म्हणजे, बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालयही या कारवाईत नष्ट करण्यात आले आहे. ही कारवाई अत्यंत अचूक आणि नियोजित पद्धतीने करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ॲापरेशन सिंदूर मॅानिटर करत होते: या संपूर्ण मोहिमेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः लक्ष ठेवून होते. लष्कर, नौदल आणि हवाई दल यांचा समन्वय साधून ही संयुक्त कारवाई पार पडली. सूत्रांच्या माहितीनुसार, भारताने आपल्या हद्दीतूनच ही कारवाई राबवली असली तरी हल्ल्याचा प्रभाव पाकिस्तानच्या 100 किमी आत दिसून आला. एकूण 9 टार्गेट ठेवण्यात आले होते आणि सर्वच लक्ष्य अत्यंत यशस्वीपणे उद्ध्वस्त करण्यात भारतीय लष्कराला यश मिळाले आहे.