Operation Sindoor: पहलगामचा बदला,भारताचा पाकिस्तानात एअर स्ट्राईक; ऑपरेशन सिंदूर नाव का दिलं?
नवी दिल्ली: 7 मे रोजी भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर तडाखेबाज हवाई कारवाई करत एक ऐतिहासिक लष्करी मोहिम यशस्वी केली. या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले. यामागचं कारण केवळ सामरिक नव्हे तर सांस्कृतिक आणि भावनिकदृष्ट्याही अतिशय महत्त्वाचं आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 25 भारतीय नागरिक आणि 1 नेपाळी नागरिकांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये नवविवाहित जोडप्यांचाही समावेश होता. विवाहानंतरच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणाऱ्या स्त्रियांचं सिंदूर त्या हल्ल्यात अक्षरशः पुसून टाकलं गेलं होतं. याचाच बदला घेण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं.
‘सिंदूर’ हे भारतीय संस्कृतीत पवित्रतेचं, सुहागचं आणि सुरक्षिततेचं प्रतीक मानलं जातं. विवाहित स्त्रीच्या कपाळावर सिंदूर म्हणजे तिच्या पतीच्या कुशलतेचा आशीर्वाद. पहलगाम हल्ल्यात जेव्हा विवाहित स्त्रियांना पती गमवावे लागले, तेव्हा केवळ एका कुटुंबाचा नव्हे, तर संपूर्ण भारतीय संस्कृतीच्या प्रतीकाचाच अवमान झाला. याच पार्श्वभूमीवर, ‘ऑपरेशन सिंदूर’ हे केवळ एक सामरिक टप्पा (strategic phase ) नसून, हा दहशतीविरुद्धचा एक भावनिक आणि सांस्कृतिक प्रतिशोध आहे. नवविवाहित नौदल अधिकाऱ्याच्या पत्नीचा सिंदूर दाखवणारा फोटो देशभरात धगधगत होता तो फोटो या ऑपरेशनच्या नावाचा अधार ठरला.

राष्ट्राच्या सन्मानासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी भारत सरकार व लष्कर एकवटले. संरक्षण तज्ज्ञांचं मत आहे की, या कारवाईचं नाव ‘सिंदूर’ ठेवल्याने देशातील प्रत्येक घराच्या भावनेला स्पर्श केला गेला. हे केवळ बदला नाही, तर त्याग करणाऱ्या शहीदांना वाहिलेली श्रद्धांजलीही आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने जागतिक समुदायालाही ठामपणे दाखवून दिलं की, दहशतवाद्यांना घरात घुसूनही निष्प्रभ केलं जाऊ शकतं आणि भारतीय संस्कृतीचं रक्षण करायची ताकद भारतात आहे.