गेल्या महिन्यात या आजारामुळे 3 महिन्यांच्या बाळासह

Brain Eating Amoeba: केरळमध्ये ‘ब्रेन-ईटिंग अमीबा’चा उद्रेक! संसर्गाने आणखी एका व्यक्तीचा बळी

Brain Eating Amoeba: केरळ राज्यात 'मेंदू खाणाऱ्या अमिबा'चा प्राणघातक कहर सुरूच आहे. शनिवारी सकाळी रतीश नावाच्या 45 वर्षीय पुरुषाचा कोझिकोड मेडिकल कॉलेज हॉस्पिटल (KMCH) मध्ये मृत्यू झाला. त्याला ताप आणि सर्दीची लक्षणे दिसल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारांना प्रतिसाद न दिल्याने अखेर त्याचा मृत्यू झाला. गेल्या महिन्यात या आजारामुळे 3 महिन्यांच्या बाळासह 3 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी आरोग्य विभागाने केली आहे. याशिवाय, आणखी एक रुग्ण सध्या KMCH मध्ये उपचार घेत आहे.

केरळमध्ये या संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढत असून, राज्यभरात आतापर्यंत 42 रुग्ण आढळले आहेत. केवळ कोझिकोड जिल्ह्यातच या वर्षी 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लहान मुलांपासून तरुणांपर्यंत विविध वयोगटातील लोकांचा समावेश आहे. याआधी 3 महिन्यांच्या बाळाचा आणि 9 वर्षांच्या मुलीचाही या संसर्गामुळे मृत्यू झाला होता.

'मेंदू खाणारा अमीबा' म्हणजे काय?

'मेंदू खाणारा अमीबा' किंवा प्राणघातक अमीबिक मेनिन्गोएन्सेफलायटीस (PAM) हा नेग्लेरिया फाउलेरी नावाच्या सूक्ष्मजीवामुळे होतो. तो प्रामुख्याने गोड्या पाण्यात (नद्या, तलाव, विहिरी, जलतरण तलाव) वाढतो. संक्रमित पाण्याच्या संपर्कातून हा जीवाणू शरीरात प्रवेश करून थेट मेंदूवर हल्ला करतो. एकदा संसर्ग झाल्यानंतर मृत्यूची शक्यता 95 टक्के पेक्षा जास्त असते.

हेही वाचा - Indigo Flight Emergency Landing: इंडिगो विमानात तांत्रिक बिघाड; कोची विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

सरकारची उपाययोजना

प्रसार थांबवण्यासाठी केरळ सरकारने राज्यभर जागरूकता मोहीम सुरू केली आहे. 'पाणी हेच जीवन'  या क्लोरिनेशन मोहिमेअंतर्गत नद्या, विहिरी, तलाव आणि स्विमिंग पूलमध्ये मोठ्या प्रमाणावर क्लोरिन मिसळले जात आहे. आरोग्य विभागाने नागरिकांना अशा पाण्यात पोहणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा - Ganesh Visarjan 2025: कडक बंदोबस्तामध्ये 69 फूट उंच 'खैरताबाद बडा गणेश' विसर्जन सोहळा

भारताबरोबरच या आजाराचे रुग्ण जगातील 20 हून अधिक देशांत आढळले आहेत. गेल्या वर्षी केरळमध्ये या आजाराची 36 प्रकरणे नोंदवली गेली होती, ज्यात 9 लोकांचा मृत्यू झाला होता. या वाढत्या प्रकरणांमुळे केरळमध्ये आरोग्य सुरक्षा आणि पाण्याच्या स्वच्छतेविषयी मोठी चिंता निर्माण झाली आहे.