पाकिस्तानचा नापाक कारवाई! भारतातील 15 प्रमुख शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न
नवी दिल्ली: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानने भारतातील 15 ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय सैन्याने हे सर्व हल्ले हाणून पाडले आहेत. पाकिस्तानकडून होणारा हा हल्ला रोखण्यासाठी भारतीय हवाई दलाने पहिल्यांदाच एस-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली (भारतीय हवाई दल एस-400 सुदर्शन चक्र हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली) वापरली आहे. भारतीय सैन्याने हार्पी ड्रोनचा वापर करून प्रत्येक हल्ला हाणून पाडला आहे. पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु भारतीय सुरक्षा दलांनी हे सर्व हल्ले यशस्वीरित्या उधळून लावले.
'या' शहरात पाकिस्तानने केला हल्ल्याचा प्रयत्न -
पाकिस्तानने अवंतीपोरा, श्रीनगर, अमृतसर, कपूरथळा, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, फलोदी, जम्मू आणि पठाणकोट या लष्करी तळांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने संपूर्ण रात्र हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारताने प्रत्येक प्रयत्न हाणून पाडला. तथापि, भारतीय लष्कराने लाहोरमधील एक हवाई संरक्षण प्रणाली निष्क्रिय केल्याचे सांगण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पूंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने मोर्टार आणि जड तोफखान्यांचा वापर करून जोरदार गोळीबार केला. या गोळीबाराला भारताने चोख प्रत्युत्तर दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील फलोदीमध्ये पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावण्यात आले. काल रात्री 10:15 वाजता ब्लॅकआउट मॉक ड्रिल दरम्यान पाकिस्तानने फलोदीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पाकिस्तानचा हा प्रयत्न भारताने हाणून पाडला.
संरक्षण मंत्रालयाने जारी केले निवेदन -
दरम्यान, भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, 7 मे च्या रात्री पाकिस्तानने उत्तर आणि पश्चिम भारतातील शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा - पाकिस्तानवर आणखी एक कारवाई! भारतीय हल्ल्यात लाहोरमध्ये हवाई संरक्षण प्रणाली नष्ट
पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर -
पाकिस्तानने आज ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथळा, जालंधर, लुधियाना, आदमपूर, बठिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भूज यासह उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु, एकात्मिक काउंटर यूएएस ग्रिड आणि हवाई संरक्षण प्रणालींद्वारे पाकिस्तानचा डाव निष्क्रिय करण्यात आला. या हल्ल्यांचे अवशेष आता अनेक ठिकाणांहून सापडत आहेत, जे पाकिस्तानी हल्ल्यांचे पुरावे आहेत.
हेही वाचा - पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन अजूनही सुरू आहे; सर्वपक्षीय बैठकीत राजनाथ सिंह यांचे मोठे विधान
याशिवाय, भारतीय सशस्त्र दलांनी आज सकाळी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य केले. विश्वसनीय माहितीनुसार, लाहोरमधील हवाई संरक्षण प्रणाली निष्क्रिय करण्यात आली आहे. यानंतर, पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पूंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये मोर्टार आणि जड तोफखान्यांचा वापर करून गोळीबार सुरू केला. पाकिस्तानच्या गोळीबारात तीन महिला आणि पाच मुलांसह सोळा निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, असे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.