ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेसवर घेतली सैनिकांची भेट
आदमपूर: पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला आहे. दोन्ही देशातील लष्करी कारवायानंतर आता भारत पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाली आहे. मात्र, तरीदेखील भारत-पाकिस्तान सीमीलगत भारतीय जवान रात्रदिवस देशाच्या संरक्षणासाठी तैनात आहेत. पंतप्रधान मोदी आज सकाळी पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर पोहोचले. येथे त्यांनी सैनिकांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांनी मोदींना भारताकडून करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली. मोदींच्या आदमपूर एअरबेस भेटीचे अनेक फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये लष्कराचे जवान पंतप्रधान मोदींसोबत खूप उत्साही दिसत आहेत. पंतप्रधान मोदींनी यापूर्वी अनेक वेळा सैनिकांना भेट देऊन त्यांचे मनोबल वाढवले आहे.
पंतप्रधान मोदींनी वाढवले सैनिकांचे मनोबल -
हवाई जवानांना भेटल्यानंतर पंतप्रधानांनी हा एक अतिशय खास अनुभव असल्याचे म्हटले आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल देश सशस्त्र दलांचे सदैव आभारी असल्याची भावना व्यक्त केली. ऑपरेशन सिंदूरचा भाग म्हणून भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य केले होते. भारत-पाकिस्तान संघर्षात आदमपूर हवाई तळाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
हेही वाचा - 'आम्ही पुढील मोहिमेसाठी तयार आहोत...'; एअर मार्शलचा पाकिस्तानला इशारा
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच त्यांच्या एक्स हँडलवर सैनिकांसोबतच्या भेटीबाबत काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोसोबत त्याने लिहिले की, 'आज सकाळी मी एएफएस आदमपूरला गेलो आणि आपल्या शूर योद्ध्यांना आणि सैनिकांना भेटलो. धैर्य, दृढनिश्चय आणि निर्भयतेचे प्रतीक असलेल्या लोकांसोबत राहणे हा एक अतिशय खास अनुभव होता. आपल्या देशासाठी आपल्या सशस्त्र दलांनी जे काही केले आहे त्याबद्दल भारत नेहमीच त्यांचा आभारी राहील.'
आदमपूर हवाई तळाबाबत पाकिस्तानने केलेला दावा खोटा -
तथापि, पंतप्रधान ज्या एअरबेसवर पोहोचले आहेत त्या एअरबेसवर हल्ला केल्याचा खोटा दावा पाकिस्तानने केला होता. पाकिस्तानने उपग्रह प्रतिमा जारी करत म्हटले होते की भारताचा आदमपूर हवाई तळ उद्ध्वस्त झाला आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय भू-गुप्तचर तज्ञ डेमियन सायमन यांनी हा फोटो बनावट असल्याचे सांगून पाकिस्तानचा पर्दाफाश केला होता.