पंतप्रधान मोदींना मॉरिशसचा सर्वोच्च सन्मान! हा पुरस्कार मिळवणारे मोदी ठरले पहिले भारतीय
PM Modi Awarded Mauritius Highest Honour: मॉरिशस सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान 'द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन' (The Grand Commander of the Order of the Star and Key of the Indian Ocean) देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. मॉरिशसचा सर्वोच्च पुरस्कार मिळणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिले भारतीय ठरले आहेत. एखाद्या भारतीय नेत्याला हा प्रतिष्ठित सन्मान देण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा सन्मान मॉरिशसचे पंतप्रधान डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींना प्रदान केला जाईल.
पंतप्रधान मोदी सध्या मॉरिशसच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत, जिथे ते विविध द्विपक्षीय करारांवर स्वाक्षरी करतील तसेच अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन करतील. या भेटीदरम्यान, त्यांनी मॉरिशसचे पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नी वीणा रामगुलाम यांना ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया (ओसीआय) कार्ड देण्याची घोषणाही केली. हा निर्णय भारताच्या इमिग्रेशन धोरणाचे आणि मॉरिशसशी असलेल्या त्याच्या खोल संबंधांचे प्रतिबिंब आहे.
हेही वाचा - PM Modi Gifts Maha Kumbh Jal: पंतप्रधान मोदींनी मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेट म्हणून दिलं महाकुंभाचे गंगाजल
मॉरिशसच्या भूमीवर भारतीयांचे रक्त आणि घाम सांडला आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसमधील भारतीय समुदायाला संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात भोजपुरी भाषेत केली. मॉरिशसची राजधानी पोर्ट लुईस येथे भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मॉरिशसची माती भारतीयांच्या रक्तात आणि घामात मिसळलेली आहे. मी जेव्हा जेव्हा मॉरिशसला येतो तेव्हा मला असे वाटते की, मी माझ्याच लोकांमध्ये आलो आहे. येथील हवा, माती आणि पाण्यात आपलेपणाची भावना आहे.'
मॉरिशसमध्ये मिनी हिंदुस्थान राहतो -
दरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'जर आपण भाषा, बोलीभाषा आणि जेवण पाहिले तर मॉरिशसमध्ये एक मिनी हिंदुस्थान राहतो. मॉरिशस हा भारताचा जवळचा सागरी शेजारी आहे आणि हिंदी महासागर क्षेत्रातील आमचा महत्त्वाचा भागीदार आहे. हा आफ्रिकन खंडाचे प्रवेशद्वार देखील आहे. आमचे ऐतिहासिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक संबंध खोलवर रुजलेले आहेत. लोकशाही, विविधता आणि परस्पर विश्वास हे आमच्या संबंधांचे सर्वात मोठे बलस्थान असल्याचंही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नमूद केलं.