पंतप्रधान मोदी AI शिखर परिषदेचे सहअध्यक्षपद भूषवणार; उद्या फ्रान्स दौऱ्यासाठी होणार रवाना
PM Modi To Co-Chair AI Summit In France: पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान फ्रान्सच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्याचा मुख्य उद्देश फ्रान्सने आयोजित केलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) शिखर परिषदेत सहभागी होण्याचा आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी या शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. तसेच पंतप्रधान मोदी या शिखर परिषदेचे सह-अध्यक्षपदही भूषवणार आहेत.
द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी मोदींचा फ्रान्स दौरा महत्त्वाचा -
फ्रान्स दौऱ्याच्या पहिल्या दिवशी, म्हणजे सोमवारी संध्याकाळी, पंतप्रधान मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या सरकारप्रमुख/राष्ट्रप्रमुख आणि इतर प्रमुख नेत्यांसाठी आयोजित केलेल्या रात्रीच्या जेवणाला उपस्थित राहतील. या रात्रीच्या जेवणाचे उद्दिष्ट देशांच्या प्रमुखांमधील द्विपक्षीय संबंध मजबूत करणे आणि विविध जागतिक मुद्द्यांवर चर्चा करणे हा आहे.
हेही वाचा - 2032 मध्ये पृथ्वीवर मोठा विनाश होणार! नासाच्या शास्त्रज्ञांचा इशारा
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी यासंदर्भातील निवेदनात म्हटलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पॅरिसला पोहोचतील. त्या संध्याकाळी एक खास जेवणाचे आयोजन केले आहे. हे रात्रीचे जेवण प्रसिद्ध एलिसी पॅलेसमध्ये होईल, जिथे तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) देखील उपस्थित राहतील.
हेही वाचा - पंतप्रधान मोदी 12-13 फेब्रुवारीला अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार; डोनाल्ड ट्रम्प यांची घेणार भेट
तिसरी उच्च-स्तरीय एआय शिखर परिषद ज-
परराष्ट्र सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तिसरी उच्चस्तरीय एआय शिखर परिषद आहे. यापूर्वी, 2023 मध्ये इंग्लडमध्ये आणि 2024 मध्ये दक्षिण कोरियामध्ये अशाच प्रकारच्या परिषदा आयोजित करण्यात आल्या होत्या. या शिखर परिषदेच्या माध्यमातून भारत आणि फ्रान्समधील तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.
पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा -
दरम्यान, फ्रान्सच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी अमेरिकाच्या दौऱ्यावर जाणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून मोदी 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या दौऱ्यावर असणार आहेत. हा दौरा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण, या दौऱ्यात भारत आणि अमेरिका यांच्यातील विविध व्यापार करारासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.