PM Modi To Visit Manipur: पंतप्रधान मोदी उद्या मणिपूर दौऱ्यावर! अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करणार
PM Modi To Visit Manipur: पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 सप्टेंबर रोजी मणिपूरला भेट देणार असून, राज्यातील दीर्घकाळ चाललेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पंतप्रधान आपला दौरा चुराचंदपूर येथून सुरू करतील, जिथे ते अलीकडील हिंसाचारामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांना भेटतील आणि मदत तसेच विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील.
मुख्य सचिव डॉ. पुनीत कुमार गोयल यांनी सांगितले की, मोदी दुपारी 12:15 वाजता ऐझॉलहून चुराचंदपूर येथे पोहोचतील. येथे ते पीस ग्राउंडवर एका मोठ्या सभेला संबोधित करतील आणि हजारो कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी करतील. यामध्ये रस्ते, पूल, वीजपुरवठा आणि इतर महत्त्वाचे पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश आहे.
यानंतर, दुपारी 2:30 वाजता पंतप्रधान इंफाळमधील कांगला किल्ल्याकडे रवाना होतील. कांगला हे मेईतेई समुदायाचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक केंद्र मानले जाते. येथेही ते विस्थापित कुटुंबांना भेटतील. तसेच अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करतील आणि एका जाहीर सभेत लोकांना संबोधित करतील.
या दौऱ्यात मणिपूरला एकूण 1,300 कोटी रुपयांच्या नवीन प्रकल्पांची भेट मिळणार आहे. तसेच 1200 कोटी रुपयांच्या पूर्ण झालेल्या कामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या प्रकल्पांमुळे राज्यात शांतता, सामान्यता आणि जलद विकासाचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. डॉ. गोयल यांनी सांगितले की, मणिपूर हे केवळ सीमावर्ती राज्य नाही, तर भारताच्या अॅक्ट ईस्ट धोरणाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. पंतप्रधानांची ही भेट राज्याच्या भविष्याला नवी दिशा देईल.