पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर 2025 रोजी आपला

PM Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 11 वर्षांत भारत चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर 2025 रोजी आपला 75 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाला 11 वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेत उल्लेखनीय बदल दिसून आले आहेत. 2014 मध्ये जेव्हा मोदी सरकारने सत्ता घेतली, तेव्हा भारत जागतिक क्रमवारीत 9व्या-10व्या स्थानावर होता आणि GDP सुमारे 2 ट्रिलियन डॉलर्स इतकी होती. मात्र, 2025 मध्ये भारताची GDP 4.19 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे, जी 100 टक्क्यांहून अधिक वाढ दर्शवते. या वाढीमुळे भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे.

या काळात भारताची अर्थव्यवस्था अनेक जागतिक आव्हानांना सामोरी गेली. कोविड-19 महामारी, रशिया-युक्रेन युद्ध आणि मध्य पूर्वेतील संघर्षांमुळे जागतिक बाजारपेठेत मोठी अस्थिरता निर्माण झाली होती. तरीसुद्धा मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने सातत्याने प्रगती केली. 2025 च्या चौथ्या तिमाहीत देशाची GDP 7.4 टक्क्यांनी वाढली, जी भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद आणि स्थैर्य दर्शवते. ही वाढ केवळ GDPपुरती मर्यादित नसून पायाभूत सुविधा, निर्यात आणि संरक्षण क्षेत्रातही उल्लेखनीय प्रगती झाली आहे.

हेही वाचा : PM Narendra Modi Birthday : गुजरातचे CM ते भारताचे PM; जाणून घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ऐतिहासिक प्रवास

मोदी सरकारने अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा राबवल्या. वस्तू आणि सेवा कर (GST), डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया यांसारख्या उपक्रमांनी अर्थव्यवस्थेला गती दिली. पायाभूत सुविधांवर दरवर्षी 100 अब्ज डॉलर्सहून अधिक खर्च करण्यात आला. रेल्वे, महामार्ग आणि विमानतळांच्या विकासामुळे उद्योग आणि गुंतवणुकीस चालना मिळाली. संरक्षण निर्यात विक्रमी 23,622 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. पीएम मुद्रा योजनेंतर्गत 2015 ते 2025 दरम्यान 52 कोटी कर्जखाती उघडण्यात आली आणि 32.61 लाख कोटींची कर्जे वितरित झाली. या योजनांनी सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना नवी संधी उपलब्ध करून दिली आणि भारताला जपानला मागे टाकून चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्यात हातभार लावला.

भविष्यात भारताचा विकासदर अधिक वेगाने वाढेल, असा अंदाज आहे. 2029 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, ज्यावेळी GDP 5.5 ट्रिलियन डॉलर्सहून अधिक असेल, असा अंदाज आहे. असमानता आणि रोजगारनिर्मिती यांसारखी आव्हाने कायम असली तरी स्वच्छ भारत, महिला सक्षमीकरण आणि शेतकरी कल्याण यांसारख्या योजना सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहेत.

मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या 11 वर्षांत भारताने केवळ आर्थिक महासत्ता बनण्याकडे वाटचाल केलेली नाही, तर जागतिक स्तरावर आपली नवी ओळख निर्माण केली आहे. GDP तील झपाट्याची वाढ, संकटांतील लवचिकता आणि राबवलेल्या संरचनात्मक सुधारणांमुळे भारताची अर्थव्यवस्था नव्या टप्प्यांकडे वाटचाल करत आहे.