वडिलांच्या अफेअरचा आर्थिक तणाव, दिशा सालियानने घेतला टोकाचा निर्णय; क्लोजर रिपोर्टमध्ये धक्कादायक बाबी उघड
मुंबई: प्रसिद्ध सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियानच्या आत्महत्येप्रकरणी आता एक नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टनुसार, दिशाने आर्थिक तणावामुळे आत्महत्या केली होती आणि या तणावामागे तिच्या वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे निर्माण झालेली परिस्थिती जबाबदार असल्याचे समोर आले आहे.
दिशा आपल्या वडिलांच्या अफेअरबद्दल कमालीची अस्वस्थ होती. या संबंधांमुळे तिला सतत संबंधितांना आर्थिक मदत करावी लागत होती, ज्यामुळे ती आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे थकून गेली होती. याबाबत तिने आपल्या मित्रांशी देखील चर्चा केली होती.
दिशाच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी झालेल्या पोस्टमॉर्टम अहवालात तिच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचे स्पष्ट झाले आहे. हात, पाय, छाती यावर जखमा आढळल्या असून, डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झालेला नसल्याचे अहवालात स्पष्टपणे नमूद आहे.
दिशाच्या आत्महत्येमागील खरी कारणे आता समोर येत असून, आर्थिक संकटामुळे ती तणावात असल्याचे स्पष्ट झाले आहे. मालवणी पोलिसांनी तपासाअंती आत्महत्या म्हणून क्लोजर रिपोर्ट तयार केला असून, या प्रकरणावरून अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.दिशा सालियानच्या मृत्यूप्रकरणात आतापर्यंत वेगवेगळ्या कोनातून चर्चा झाली आहे. मात्र, आर्थिक तणाव आणि कौटुंबिक समस्या यामुळेच तिने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणावर पुढील कोणती कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.