काश्मीरच्या कानाकोपऱ्यात पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे पोस्टर; शोधणाऱ्याला 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर
श्रीनगर: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे गुन्हेगार अजूनही फरार आहेत. भारतीय सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा शोध तीव्र केला आहे. दरम्यान, लष्कराने सार्वजनिक ठिकाणी हल्ल्यातील दोषींचे पोस्टर्स लावले आहेत. याआधी, गेल्या महिन्यात, एजन्सींनी दहशतवाद्यांचे फोटो प्रसिद्ध केले होते आणि त्यांच्याविरुद्ध प्रत्येकी 20 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. पहलगाम हल्ल्यापासून सैन्य आणि एजन्सी सतत दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. आधी या दहशतवाद्यांचे स्केच आणि नंतर पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत.
पोस्टरमध्ये लोकांना दहशतवाद्यांबद्दल माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. जेणेकरून त्यांना लवकर पकडता येईल. यासोबतच माहितीसाठी पोस्टरवर दोन क्रमांक देखील छापलेले आहेत. सध्या, एनआयए या हल्ल्याचा तपास करत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेले तिन्ही दहशतवादी पाकिस्तानचे आहेत. आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा अशी त्यांची नावे आहेत. एजन्सींनी सांगितले की, तिन्ही दहशतवाद्यांची कोड नावे मुसा, युनूस आणि आसिफ असे होते.
हेही वाचा - ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेसवर घेतली सैनिकांची भेट
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 100 हून अधिक दहशतवादी ठार -
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता. पहलगाम हल्ल्यानंतर 15 दिवसांनी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. याअंतर्गत, हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. यानंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध प्रत्युत्तरात्मक कारवाई सुरू केली.
पाकिस्तानने जम्मू ते गुजरातपर्यंतच्या सीमावर्ती शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले. यानंतर भारताने पाकिस्तानच्या प्रमुख शहरांवर ड्रोनने हल्ला केला. यासोबतच भारताने पाकिस्तानमधील अनेक एअरबेस उद्ध्वस्त केले. यानंतर पाकिस्तानने अमेरिकेला युद्धबंदीचे आवाहन केले, त्यानंतर भारताने युद्धबंदीला संमती दिली. सोमवारी पंतप्रधानांनी पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा देताना ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचं म्हटलं आहे.