पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका भेटीनंतर प्रवेश वर्मा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी 12-13 फेब्रुवारी रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यासाठी अमेरिकेला भेट देणार आहे. 27 वर्षांनंतर दिल्लीत भाजप पुन्हा सत्तेत येत असल्याने राजधानीत मुख्यमंत्री शपतविधी सोहळा भव्य स्वरूपाचा असणार आहे. एनडीए शासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री या भव्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा - दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'या' नेत्याला मिळाली सर्वाधिक मते
प्रवेश शर्मा दिल्लीचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता -
भाजपने अद्याप मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचेही नाव अधिकृतपणे जाहीर केलेले नाह. परंतु नवी दिल्लीचे नवनिर्वाचित आमदार प्रवेश वर्मा यांना मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून पाहिले जात आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचा पराभव करून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. पश्चिम दिल्लीचे दोन वेळा खासदार राहिलेले प्रवेश वर्मा यांना गेल्या वर्षी संसदीय निवडणुकीचे तिकीट नाकारण्यात आले होते. परंतु त्यांनी विधानसभा निवडणूक यशस्वीरित्या लढवली आणि केजरीवाल यांचा 4 हजार मतांनी पराभव केला. प्रवेश वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री दिवंगत साहिब सिंग वर्मा यांचे चिरंजीव आहेत.
हेही वाचा - दिल्लीतील एकमेव ट्रान्सजेंडर उमेदवाराला किती मते मिळाली? 'या' जागेवरून लढवली होती निवडणूक
नवी दिल्ली मतदारसंघातील भाजपचे विजयी उमेदवार प्रवेश वर्मा यांनी पश्चिम दिल्लीतील मुंडका येथील डॉ. साहिब सिंग वर्मा समाधी स्थळावर त्यांचे वडील आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री दिवंगत साहिब सिंग वर्मा यांना पुष्पांजली वाहिली. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राष्ट्रीय राजधानीत सरकार स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
केजरीवाल यांना हरवणारे प्रवेश वर्मा कोण आहेत?
दिल्लीच्या राजकारणात केजरीवाल यांच्या विरोधात सर्वात जास्त आवाज उठवणारा कोणी असेल तर ते प्रवेश वर्मा आहेत. ते माजी मुख्यमंत्री साहेब सिंग वर्मा यांचे पुत्र असून ते दिल्लीचे माजी खासदार देखील राहिले आहेत. प्रवेश वर्मा यांनी 2013 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत मेहरौली मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि काँग्रेसच्या योगानंद शास्त्री यांचा पराभव केला. यानंतर, मे 2014 मध्ये, ते लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. 2019 मध्ये, ते पुन्हा एकदा लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. याशिवाय, 2013 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान ते दिल्ली भाजप निवडणूक समितीचे सदस्य होते. तथापी, नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा मोठ्या मताधिक्यांनी पराभव केला.