ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान मोदींनी केले सैन्याचे कौतुक; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदी काय म्हणाले?
नवी दिल्ली: भारतीय सैन्याने पहलगाममधील क्रूर दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर क्षेपणास्त्र हल्ला करून 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारताच्या कारवाईत 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले आहेत. पंतप्रधान मोदी स्वतः भारतीय सशस्त्र दलांच्या या कारवाईवर लक्ष ठेवून होते. तथापि, बुधवारी पंतप्रधान मोदींनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल चर्चा केली.
पंतप्रधान मोदींनी केले सैन्याचे कौतुक -
दरम्यान, मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना पाकिस्तानविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईची माहिती दिली. या बैठकीला गृहमंत्री अमित शाहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जेपी नड्डा, शिवराज सिंह चौहान यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आणि संपूर्ण देश त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले. भारतीय सैन्याने तयारीनुसार आणि कोणतीही चूक न करता ही कारवाई केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याबद्दल भारतीय सैन्याचे कौतुक केले.
हेही वाचा - भारतीय सैन्याने जारी केला ऑपरेशन सिंदूरचा व्हिडिओ; पहा भारताने कसे केले 'सर्जिकल स्ट्राईक'
पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींना दिली ऑपरेशन सिंदूरची माहिती -
तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली आहे. राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेण्यासाठी ते राष्ट्रपती भवनात पोहोचले होते. दोन्ही नेत्यांच्या भेटीचे फोटो समोर आले आहे. यासोबतच केंद्र सरकारने गुरुवारी सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ही बैठक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली होईल.
हेही वाचा - Operation Sindoor: जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक, पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझहर याचे 10 कुटुंबीय ठार
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या 15 दिवसांनंतर, भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 ठिकाणी हवाई हल्ले केले. 25 मिनिटांच्या या हल्ल्यात भारतीय सैन्याने 21 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. प्राप्त माहितीनुसार, पीओकेमधील मुझफ्फराबाद येथील लष्करच्या सवाई नाला प्रशिक्षण केंद्राला प्रथम लक्ष्य करण्यात आले. याशिवाय मुजफ्फराबादमधील सय्यदना बिलाल कॅम्प, कोटलीमधील लष्करचा गुरपूर कॅम्प, बर्नाला कॅम्प आणि कोटलीमधील अब्बास कॅम्प उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.