प्रियांका गांधींना मिळू शकते नवी जबाबदारी! पक्षाचे उपाध्यक्ष पद देण्याबाबत चर्चा सुरू
नवी दिल्ली: काँग्रेसच्या सरचिटणीस आणि केरळमधील वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी यांना पक्षात आता मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. माध्यमामधील वृत्तांनुसार, पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना सक्षम बनवून त्यांना जबाबदारी देण्याच्या पायलट प्रोजेक्टचा आराखडा प्रियंका गांधी वड्रा यांनी स्वतः तयार केला असून काँग्रेस पक्ष हा पायलट प्रोजेक्ट गुजरातमधून सुरू करणार आहे. तसेच जर हा प्रोजेक्ट यशस्वी झाला तर तो व्यापक पातळीवर सुरू करण्याची पक्षाची योजना आहे.
प्रियंका गांधी बनू शकतात काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्ष -
काँग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका गांधी वाड्रा यांना पक्षाचे उपाध्यक्ष बनवण्यासह अनेक पर्यायांवर पक्षात चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही. प्रियंका गांधी वाड्रा सध्या पक्षाच्या सरचिटणीस आहेत, परंतु त्यांच्याकडे अद्याप कोणताही पदभार नाही. प्रियंका गांधी पडद्यामागे महत्त्वाची भूमिका बजावत आहे, त्याचे एक उदाहरण म्हणजे गुजरातमधील जिल्हाध्यक्षांना अधिक अधिकार देण्याचा पायलट प्रोजेक्ट.
प्राप्त माहितीनुसार, काँग्रेस पक्ष आता संघटना मजबूत करण्यासाठी कार्यात्मक बदलांवर अधिक भर देईल आणि पक्ष आपल्या संघटनेत आणखी अनेक बदल करेल ज्यामुळे पक्षाच्या कामकाजात व्यापक सुधारणा होईल. अलीकडेच गुजरातमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन झाले होते, या अधिवेशनात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हजेरी लावली होती. परंतु, प्रियंका गांधी या अधिवेशनापासून दूर राहिल्या, त्यामुळे भाजपनेही काँग्रेसवर निशाणा साधला होता.
दरम्यान, त्यावेळी भाजपने म्हटले होते की, प्रियांका गांधींच्या राष्ट्रीय अधिवेशनात अनुपस्थिती गांधी भावंडांच्या अंतर्गत बाबींबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करते. तथापी, दुसऱ्या एका कार्यक्रमात प्रियंका गांधी यांची अनुपस्थिती पक्षात सर्व काही ठीक नसल्याचं स्पष्ट संदेश देते, असंही भाजप नेत्यांनी म्हटलं होतं. परंतु, आता प्रियंका गांधी यांना काँग्रेस पक्षात कोणती मोठी जबाबदारी मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.